मुंबई Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मारेकरी मॉरिस नरोनावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी खून प्रकरणी 302, आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाच गोळ्या झाडल्या होत्या : मॉरिस नरोनानं अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. ज्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, घोसाळकर यांच्या छातीच्या डाव्या बाजूला आणि जांघेमध्ये गोळ्या लागल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपासाला सुरुवात झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं. यावेळी समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.
संजय राऊतांचा 'माफिया राज'चा आरोप : अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीक करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात 'गुंडा राज' आणि 'माफिया राज' असल्याचा आरोप केला. "हे 'माफिया राज' 'शिंदे सरकारचा आशीर्वाद आहे. आम्ही गप्प बसणार नाही. तुमची ईडी, सीबीआय आता कुठे आहे? या 'गुंडा राज'ला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत", असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
अजित पवारांची प्रतिक्रिया : या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "अशी घटना महाराष्ट्रात घडायला नको होती. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. असा प्रकार घडला तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सरकारला बदनाम करण्याचा आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा मुद्दा विरोधकांना सापडला हे मी नाकारत नाही. परंतु या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमीही पाहायला हवी. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."
हे वाचलंत का :