सातारा : बहुमतात येऊनही महायुती सरकारकडून सत्ता स्थापनेला उशीर होत असल्यानं सातारा जिल्ह्यातील शेकडो गावातील ग्रामस्थांना फटका बसत आहे. कोयना धरणात 102 टीएमसी पाणीसाठा असूनही अनेक दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेलं नाही. नदीकाठच्या पाणी पुरवठा आणि उपसा सिंचन योजनांचे जॅकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळं कोयना आणि कृष्णा नदीकाठी पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसंच आज (2 डिसेंबर) अनेक गावात पाणी पुरवठाही होणार नाही.
धरणात मुबलक पाणी, तरी नदीपात्र कोरडं : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळं कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. तसंच वीजनिर्मितीदेखील पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. परंतु, गेली अनेक दिवस धरणातून पाणीच सोडण्यात आलेलं नाही. कालवा समितीची बैठक न झाल्यामुळं पाणी सोडण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होऊ शकला नसल्याचं धरण व्यवस्थापानील सुत्रांचं म्हणणं आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना कोयना आणि कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडल्यानं कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पुर्वेकडं पाणी सोडण्याची मागणी : कोयना धरणाच्या पुर्वेकडील कोयना, कृष्णा नदीकाठच्या पाणी आणि सिंचन योजना पाण्याअभावी बंद आहेत. त्यामुळं कोयना धरणातून सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी झाली आहे. मात्र, सध्या महायुती सरकार स्थापन झालेलं नाही. तसंच कालवा समितीची बैठकही होऊ शकलेली नाही. त्यामुळं यासंदर्भात कोणतेही आदेश दिले गेले नसल्यानं कोयना धरण व्यवस्थापनाला पाणी सोडण्याचा निर्णय घेता आलेला नाही.
धरण उशाला अन् कोरड घशाला : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना तांबवे गावाचे माजी उपसरपंच धनंजय ताटे म्हणाले की, "कोयना धरणात 102 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. परंतु, दीड महिन्यापासून धरणातून पाणी सोडलेलं नाही. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे जॅकवेल उघडे पडले आहेत. अशा परिस्थितीत डोक्यात हंडे, कळशा घेऊन नदीतून पिण्याचे पाणी आणण्याची वेळ नदीकाठच्या महिला, नागरीकांवर आली आहे. नदीपात्रात पाण्याचे डोह झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने तातडीनं नदीपात्रात पाणी सोडावं."
- जिल्हाधिकाऱ्यांकडं मागितली परवानगी : कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी आल्यानंतर व्यवस्थापनाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलाय. कोयना आणि कृष्णाकाठची परिस्थिती गंभीर बनल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी आज पाणी सोडण्याबाबत निर्णय देतील, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनातील सुत्रांनी दिली.
हेही वाचा -