मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाल्यानंतर आता त्यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य पालिका निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलंय. याचाच एक भाग म्हणून विशेषतः मुंबई महापालिकेवर शिवसेनेने लक्ष्य दिल्याचं पाहायला मिळतंय. कारण यावेळी मुंबई पालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवायचा, असा इरादा शिवसेनेचा दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपासुद्धा मुंबई पालिका निवडणुकीत विजय मिळवायचा म्हणून मागील कित्येक महिन्यांपासून तयारी करीत आहे. तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली असून, भाजपाला आव्हान देण्यासाठी आणि शिवसेना (ठाकरे) यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्याचे लक्ष्य ठेवलंय. शिंदे प्रत्येक प्रभागातील विकासकामांचा वैयक्तिक आढावा घेणार आहेत, त्यामुळे भाजपा, तसेच शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची लढत होणार असल्याचं बोललं जातंय.
लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीमुळे आत्मविश्वास दुणावला : यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यात. मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अपेक्षापेक्षा चांगले यश मिळाले तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी 57 आमदार निवडून आणले. एकनाथ शिंदे यांना 30 ते 40 जागा मिळतील, असं राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ आणि जाणकार म्हणत होते. पण या सर्वांचा अंदाज फोल ठरवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा कमालीचा आत्मविश्वास दुणावला असून, आगामी होणाऱ्या पालिका निवडणुकीतदेखील आपला विजय नक्की आहे. म्हणून कामाला लागण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
रणनीती काय?
- केलेली विकास कामे तळागाळातील मुंबईकरापर्यंत पोहोचवणार
- मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीवर आढावा घेणार
- मतदारांना विश्वासात घेऊन वॉर्डामधील विकासकामांना प्राधान्य देणार
- पक्षाची कामं आणि योजना मुंबईकरांपर्यंत पोहोचवणार
- जे नवमतदार आहेत, त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून, त्यांचे मतदार यादीत नाव आहे की नाही? याची पडताळणी करणार
- प्रभागातील लोकांचे प्रश्न, समस्या या सोडवण्यावर भर द्या
आम्हाला 100 टक्के विजयाची खात्री : एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना अशा सहा पद्धतीच्या सूचना केल्या असून, त्यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यासंदर्भात बैठकीत माहिती दिल्याचंही बोललं जातंय. येत्या काही महिन्यांतच रखडलेल्या महापालिका निवडणूक होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुंबई महापालिकेचा बजेट हा देशातील इतर छोट्या राज्यांहून मोठा असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच मुंबईतूनच कित्येक कोटी महसूल हा देश पातळीवर जमा केला जातो. तसेच मुंबई हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे शहर मानलं जातं. या मुंबई महापालिकेवर मागील 25 वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गटाची) सत्ता आहे. पण आता कोणत्याही परिस्थितीत येथे भगवा झेंडा फडकवायचा असल्याचा निश्चय भाजपासह शिंदेंच्या शिवसेनेने केलाय.
शिंदेंकडे उबाठा गटातून आलेले 82 माजी नगरसेवक : "सध्या आमच्याकडे उबाठा गटातून आलेले 82 माजी नगरसेवक आहेत. तसेच अजूनही आमच्या पक्षात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते येण्यास तयार आहेत. सध्या शिंदे साहेबांनी मागील अडीच वर्षांत मुंबईत अनेक विकासकामं केलीत. त्यामुळेच आता मुंबई महापालिका जिंकायची म्हणून आमच्या बैठका सुरू आहेत. शिंदे साहेबांनी आणि पक्षाने विजयासाठी रणनीती आखली असून, मुंबई महापालिकेत आमचा विजय निश्चित आहे. त्य विजयाची आम्हाला नक्की खात्री आहे. त्यामुळे आम्ही आता प्रत्येक वॉर्डामधील कामाचा आढावा घेत आहोत. मुंबईकर आम्हाला नक्की कौल देतील, असा विश्वास माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना व्यक्त केलाय.
हेही वाचा-