मुंबई Oman Embassy letterhead Theft : ओमान दूतावासाच्या लेटरहेडवर चालकानं डल्ला मारल्यानं मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी ओमान दूतावासाच्या सचिवानं कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन चालकाविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 379 आणि 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमान दूतावासातून लेटरहेड लांबवले : आपल्या तक्रारीत सचिवांनी पोलिसांना सांगितलं की, "नरिमन पॉइंट मेकर चेंबरमध्ये असलेल्या ओमान दूतावासात सुमारे 30 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 6 भारतीय चालक देखील कार्यरत आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सचिव त्यांच्या केबिनमध्ये असताना रिजवान मुस्ताक अहमद (वय 46) गुलाबी रंगाच्या प्लास्टिक फाईलमध्ये काही कागदपत्रं घेऊन आला. जेव्हा दूतावासाचा माजी चालक त्याला भेटायला येईल, तेव्हा ही बॅग घेऊन जाईल, असं रिजवाननं सचिवांना सांगितलं. याबाबत सचिवास काही शंका आल्या होत्या. म्हणून सचिवानं बॅग उघडली तेव्हा, त्यात ओमान दूतावासाचे चार कोरे लेटरहेड सापडले. याबाबत सचिवांनी तातडीनं व्हाईस कॉन्सुलेटला माहिती दिली. याची माहिती कॉन्सुलेट जनरललाही देण्यात आली."
कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : रिजवान पुन्हा सचिवाकडं गेला आणि बॅग मागू लागला. त्यावेळी त्याच्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात होती. रिजवान चालकाला गेटवर थांबवून विचारपूस केली असता तो योग्य उत्तरे देऊ शकला नाही. हे लेटर हेड ते स्वत:साठी वापरणार असल्याचं त्यानं सांगितलं. पण रिजवानच्या बोलण्यावर दूतावासाचा अजिबात विश्वास नव्हता. याप्रकरणी त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत "कफ परेड पोलीस ठाण्यात लेटरहेड चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप तपासात ठोस काहीही समोर आले नाही," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांनी दिली आहे.
लेटरहेडसह रंगेहात पकडलं : फाईल घेवून रिझवान हा कॉन्सुलेटच्या बाहेर पडण्याच्या तयारीत होता. यावेळी व्हाईस कॉन्सुलेट जनरल यांचे सचिव आणि स्वतः कॉन्सुलेट जनरल यांनी रिजवानला रंगेहात 4 ओमान कॉन्सुलेटचे कोरे लेटरहेड असलेली गुलाबी रंगाच्या फाईलसह पकडलं. या फाईलमधील कॉन्सुलेटचे कोरे लेटरहेड हे रिजवानच्या ताब्यात कसे आले, याबाबत कॉन्सुलेट जनरल यांनी रिजवानला विचारलं असता, त्यानं कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यानंतर कॉन्सुलेटचे कोरे लेटरहेड कॉन्सुलेट जनरल यांनी त्यांच्या ताब्यातून घेतले. यावेळी रिजवानला घरी जावून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं. रिजवानला व्हॉईस कॉन्सुलेट जनरल यांच्या ऑफीसमध्ये नेवून घडलेल्या घटनेबाबत विचारणा केली असता, यानं ओमान कॉन्सुलेटचे चार कोरे लेटरहेड हे स्वतः च्या वापरासाठी घेतल्याचं कबूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दिल्ली येथील ओमान एम्बेसी यांना माहिती देऊन या घटनेबाबतचा तक्रार अर्ज कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा :