अमरावती Dr M S Swaminathan : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृत्यर्थ 'हरित क्रांतीचे प्रणेते' डॉ एम एस स्वामीनाथन हे भारताच्या कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक म्हणून विदर्भ दौऱ्यावर आले. त्यावेळी म्हणजे 23 एप्रिल 1976 रोजी अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालय परिसरात वटवृक्षाचं एक छोटसं रोपटं लावलं. आज 48 वर्षानंतर त्या रोपट्याचा भलामोठा वटवृक्ष झाला आहे. या वृक्षाच्या सभोवताल बांधण्यात आलेल्या खास ओट्यावर हा वृक्ष डॉ एम एस स्वामीनाथन यांनी लावलं असल्याचा उल्लेख असणारी पाटी लक्ष वेधणारी आहे. भारतात कृषी क्रांती घडवणारे भारतरत्न डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त 'ईटीव्ही ' भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
अमेरिकेनं तुच्छ लेखताच पडली हरित क्रांतीची ठिणगी : "1960 मध्ये भारतात प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी भारतानं अमेरिकेला धान्याची मागणी केली. त्याच दरम्यान अमेरिकेनं व्हिएतनाम(Vietnam) विरोधात युद्ध पुकारलं. या युद्धाला भारतानं पाठिंबा जाहीर करावा, अशी अट अमेरिकेनं घातली. मात्र, अलिप्त धोरणामुळं भारतानं अमेरिकेला व्हिएतनाम विरुद्ध युद्धात पाठिंबा देण्यास नकार दिला. दरम्यान, पोडॅक ब्रदर्स या अमेरिकेतील तत्कालीन अर्थशास्त्रज्ञानं "भारतातील अर्धे लोक उपासमारीनं मरतील. भारत धान्याची परत फेड कधीही करू शकणार नाही. त्यामुळं भारताला धान्य देऊ नये," असं मत व्यक्त केलं. अशा परिस्थितीत अमेरिकेनं भारताला धान्य देण्यास नकार देत अमेरिकेत जनावरांना खाऊ घातला जाणारा 'मायलो गहू' पाठवला. अमेरिकेची ही कृती भारताला तुच्छ लेखणारी होती. परंतु अमेरिकेच्या या कृतीतूनच देशाचे तत्कालीन कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रेरणेतून डॉ एम एस स्वामीनाथन यांनी भारतात हरितक्रांती घडवून आणली," अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख मार्गदर्शन केंद्राचे माजी संचालक प्राध्यापक डॉ वैभव म्हस्के यांनी दिली.
वैद्यकीय अभ्यासक्रम सोडून कृषी अभ्यासक्रमाला दिलं महत्व : तामिळनाडूमध्ये असणाऱ्या कुंभकोणम गावात डॉक्टर पित्याच्या घरी एम एस स्वामीनाथन यांचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. परंतु वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून ते कृषी अभ्यासक्रमाकडं वळले. केरळमधील महाराज कॉलेजमधून त्यांनी कृषी क्षेत्रातील पदवी मिळवली. पुढं दिल्ली येथील इंडियन अॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1952 मध्ये त्यांनी आचार्य पदवी मिळवली.
कृषी क्षेत्रात मोलाचं योगदान : "कल्याण सोना आणि सोनालिका हे दोन गव्हाचे वाण डॉ एम एस स्वामीनाथन यांनी विकसित केलेत. यासह तांदुळाच्या जया आणि आय आर 8 हे खास वाण तयार करुन हरित क्रांतीची बीजं देशाच्या मातीत रोवली. 1980 ते 1985 दरम्यान आंध्रप्रदेशमध्ये कापूस उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. त्यावेळी डॉ स्वामीनाथन यांनी एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन या नावानं संस्था स्थापन केली. त्या अंतर्गत व्हिलेज नॉलेज सेंटर आणि व्हिलेज रिसोर्स सेंटरद्वारे शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात भरीव कामगिरी करुन कापूस उत्पादकांसाठी भरभराटीचे दिवस आणलेत," अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांमध्ये रुजवला स्वाभिमानी बाणा : "बटाटा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाचं वाण डॉ. स्वामीनाथन यांनी उपलब्ध करुन दिलं. कधीकाळी अन्नटंचाई असणाऱ्या देशात आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत अन्न ही मूलभूत गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वाभिमानी बाण्यानं स्वयंस्फूर्त करण्याचे डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी आटोकाट प्रयत्न केलेत. यामुळंच आज भारतानं धान्य उत्पादक आणि प्रमुख निर्यातदार देश म्हणून आपली ओळख निर्माण केली," असं देखील प्रा. राजेंद्र पाटील यांनी सांगितलं.
वटवृक्षाखाली कृषी तज्ज्ञांचं स्मरण : "वऱ्हाडातील काळ्या कसदार सुपीक जमिनीचा आढावा घेण्याच्या निमित्तानं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक म्हणून डॉ. एम एस स्वामीनाथन विदर्भाच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन आणि दुग्ध विज्ञान विभागाच्या परिसरात 23 एप्रिल 1976 ला वटवृक्षाचं लहानस रोपटं लावलं. आज या वटवृक्षाचा घेर हा शंभर फुटांचा झाला आहे. या वृक्षाच्या खाली परिसरात असणाऱ्या महाविद्यालयाच्या दूध संकलन केंद्रातील गाई , वासरं, मशींची जोपासना केली जाते. एक शुद्ध हवेचा स्त्रोत म्हणून या वटवृक्षकडं पाहिलं जातं. या विभागात येणारे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शेतकरी या वृक्षाखाली विसावा घेतात. या वटवृक्षामुळे डॉ. एम एस स्वामीनाथन या महान कृषी तज्ज्ञाचं स्मरण केल्या जाते," असं महाविद्यालयातील पशुसंवर्धन आणि दुग्ध विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ नंदकिशोर खंडारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा