मुंबई- दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात शुक्रवारी पहाटे चार मजली इमारतीचा अंशत: भाग कोसळला आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एका अधिकाऱ्यानं सांगितले की, निशानपाडा रोडवर मध्यरात्री 12.30 च्या सुमारास इमारातीचा काही भाग कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारत जीर्ण अवस्थेत असल्यानं इमारतीत कोणीही राहत नव्हते. शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. इमारतीजवळ स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडूनदेखील शोध मोहीम राबविली जात आहेत. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि इतर कर्मचारी ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.
इमारतीला गेले होते तडे-कोसळलेल्या इमारतीला अनेक तडे गेले होते, असे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले, "नूर व्हिला नावाची इमारत कोसळली आहे. त्या इमारतीला खूप तडे गेले होते. पण दुरुस्तीचं काम झाले नव्हते. आज या इमारतीचा काही भाग कोसळला. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बीएमसी, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे".
कशामुळे कोसळतात जुन्या इमारती?मुंबईत अनेक जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे अशा जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईला पुरासारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा धोका आहे. मुंबईत 14,000 पेक्षा जास्त इमारती 50 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. देखभालीच्या अभावामुळे अनेकदा इमारती कोसळल्याचा धोका असतो. मुंबईत दरवर्षी सरासरी 300 पेक्षा जास्त घरे कोसळण्याच्या घटना घडतात. यापैकी बऱ्याच इमारतींमध्ये योग्य रिकामे करण्याची योजना नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2021 या कालावधीत संपूर्ण मुंबईत इमारत आणि घरे कोसळण्याच्या तसेच आंशिक इमारत आणि घर कोसळण्याच्या 1,810 घटनांमध्ये एकूण 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 376 लोक जखमी झाले आहेत.
हेही वाचा-