मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये पक्षाचे पोस्टर दाखवून छुपा प्रचार केला जात असल्याची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडं केली आहे. या पोस्टरबाजीसाठी संबंधित वाहिनीला अधिकृतपणे पैसे देण्यात आले आहेत का? आणि नसेल तर हा काळ्या पैशाचा व्यवहार होईल. त्यामुळं निवडणूक आयोगानं आणि आर्थिक गुन्हे शाखेनं याची दखल घेऊन चौकशी करण्याची मागणीही सावंत यांनी केली आहे.
पक्षावर होणार कारवाई? : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यानं आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र, अशावेळी असे प्रकार घडत असल्यानं हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून रितसर परवानगी न घेता असा प्रकार घडल्यानं अशा प्रकारे आणखी कोणत्या क्लृप्त्या राजकीय पक्षांकडून वापरल्या जात आहेत का? याची देखील चौकशी करावी. खुलेआम हा प्रकार घडत असल्यानं शिवसेना पक्षाविरोधात आणि संबंधित वाहिनीविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सावंत यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
तक्रार दाखल : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटून सावंत यांनी याबाबत लेखी निवेदन देऊन तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. इतर वाहिन्यांवर देखील अशा प्रकारे छुप्या पद्धतीनं प्रचार केला जात असल्याची चौकशी करण्यात यावी, असंही सावंत म्हणालेत. यावेळी मुंबई काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष नंदेश पिंगळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -