नाशिक/अहमदनगर Eknath Shinde : जिल्ह्यातील शहापंचाळे येथे सुरू असलेल्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या महाराजांच्या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी महंत रामगिरी महाराज यांचं कौतुक करत संतांच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचं वक्तव्य केलंय. "राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. राज्यातील संत परंपरा मोठी आहे. संतांच्या आशीर्वादानं राज्य चालू आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
80 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा : "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 80 लाख भगिनींच्या खात्यात जमा झाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत महिलांच्या खात्यात दीड कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहेत. उर्वरित भगिनींच्या खात्यात टप्प्याटप्प्यानं रक्कम जमा केली जाईल," असंही मुख्यमंत्री म्हणाले. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे. आम्ही लाडकी बहिण, लाडका भाऊ अशा योजना राबवत आहोत. मात्र जनतेची दिशाभूल करत विरोधक या योजनांच्या विरोधात न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयानं त्यांना तोंडावर पाडलंय. न्यायालयात जाऊन विरोधकांनी पाप केलंय. मी तसंच आमचे दोन उपमुख्यमंत्री सर्व राज्यातील भगिनींच्या पाठीशी आहोत. राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराजांवर कायदेशीर कारवाईची मागणी : रामगिरी महाराज यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात रोष निर्माण झालाय. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळं छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर शहरातील रस्त्यावर मोठा जमाव आला होता. रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जमावानं केली होती. विशेष म्हणजे रामगिरी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वैजापूर तसंच येवला येथंही गुन्हे दाखल आहेत. राज्याच्या विविध भागात रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याविरोधात संतापाचं वातावरण पाहायला मिळतय.
'हे' वाचलंत का :
- महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024
- दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडी सोपविणार मोठी जबाबदारी? काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा - Assembly Election 2024
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काकांसोबत पॅचअप होणार का? अजित पवारांनी दोन शब्दात संपवला विषय! - AJIT PAWAR NEWS