मुंबई Chitrakoot Kolkata Art Gallery : चित्रकूट कोलकाता आर्ट गॅलरीचे बनावट पुरातन शिल्प पिता-पुत्रानं मुंबईतील व्यासायीकाला विकल्याची घटना घडली आहे. शैलेश कनुभाई शेठ (वय 58) असं या व्यावसायिकाचं नाव असून पिता-पुत्रानं त्यांना 22 लाखांचा चुना लावला आहे. याबाबत आरोपी प्रकाश केजरीवाल तसंच प्रभास केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी दिली आहे.
व्यावसायीकाची फसवणूक : फिर्यादी शैलेश शेठ यांनी नोंदवलेल्या जबानीनुसार, सेठ यांचा ई-आर्ट गॅलरी या नावानं खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या आर्ट गॅलरीचं लॅमिंटन रोडवर कार्यालय आहे. 1 मे 2022 रोजी शैलेश शेठ यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्रकाश केजरीवाल यांनी फोन केला होता. तेव्हा, कलकत्ता येथील चित्रकूट आर्ट गॅलरीमध्ये प्रकाश केजरीवाल यांची आर्ट गॅलरी असल्याचं सांगितलं. तुम्हाला आमच्याकडून पेंटिंग, शिल्पकला मिळतील, असं त्यांनी सांगितलं. त्यातील काही फोटो आरोपींनी chitrakootart@gmail.com या ईमेल आयडीवरून शेठ यांना पाठवले. त्यातील काही चित्रं, शिल्पं शेठ यांना आवडली.
खोटी प्रमाणपत्र दाखली : त्यानुसार शेठ यांनी कलकत्ता येथील चित्रकूट आर्ट गॅलरीला भेट दिली. प्रकाश केजरीवाल यांचा मुलगा प्रभास केजरीवाल यांची भेट घेतली. दोघांनीही शेठ यांना जुनं शिल्प दाखवलं. त्यावेळी त्यांनी इतिहासाचे दाखले दाखवत शिल्प दाखवलं. मूर्तीच्या इतिहासाचं प्रमाणपत्र मुकुल डे, मिनार डे, त्यांची नात शिवश्री ओकील यांच्या नावानं देण्यात आलं होतं. आरोपींनी ही कागदपत्रं खरी असल्याचं भासवलं. यावर विश्वास ठेवून शेठ यांनी हे शिल्प अकरा लाख रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर खरेदी केलेलं शिल्प शेठ यांच्या लॅमिंग्टन रोड येथील कार्यालयात ठेवण्यात आलं.
डॉ. भा. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार : दाखल तक्रारदार शैलेश शेठ यांनी अकरा लाखात दोन शिल्पे खरेदी केली होती. ही शिल्पे कार्यालयात ठेवल्यानंतर जुलै 2022 मध्ये ती विक्रीसाठी ठेवली असता ती बनावट असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर शेट यांनी याची माहिती प्रकाश केजरीवाल यांना कलकत्ता येथील फोनवर दिली. मात्र, प्रकाश केजरीवाल यांनी प्रतिसाद दिला नाही. फिर्यादी शेठ यांनी ही शिल्पं बनावट असल्याचं सांगत केजरीवाल यांना पैसे परत करण्यास सांगितलं. मात्र, दोघांनी त्याला उद्धट उत्तरे देऊन धमकावण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर फिर्यादींनी डॉ. भा. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.