मुंबई Eknath Shinde : राज्य विधिमंडळाच्या महायुती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात पुन्हा एकदा राजकीय भाषण केलं. गेल्या दोन वर्षात राज्य सरकारनं अनेक कामं केली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली. एनडीआरएफच्या मदतीचा निकषांमध्ये दुप्पट वाढ केली, आपत्तीग्रस्तांना मदत केली, जलशिवार योजना पुन्हा एकदा जोमानं राबवली, असं त्यांनी सभागृहात सांगितलं. महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींना 100% शैक्षणिक शुल्कात सवलत, अशा अनेक योजना राज्य सरकारनं राबवल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्यासाठी विविध योजना राबवल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना राबवल्याच्या त्यांनी उल्लेख केला.
उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी : काही लोक शेतावर बांधावर जात नाही, घरात बसून बोलत राहतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाचीच फक्त जबाबदारी वाटते. काही लोकांना गर्दीची एलर्जी असते, ते गर्दीत गेले, की त्यांना सर्दी होते, असा टोलाही त्यांनी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. गिरणी कामगारांना 15000 घरे दिली. विरोधकांनी धारावीच्या विकासाच्या आड येण्याचं काम केलं. आम्ही धारावीचा पुनर्विकास पुन्हा एकदा जोरानं सुरू केला. पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करणार, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. समुद्राचे पाणी प्रदूषित करण्यात आलं होतं, ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रकल्प राबवले, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
पालघरमध्ये विमानतळाची चाचणी : मुंबई विमानतळाची क्षमता लक्षात घेता विमानतळ विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी पालघर येथे विमानतळ करण्याबाबतची चाचपणी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. समृद्धी रस्त्यामध्ये ज्या कंत्राटदारानं योग्य काम केलं नसेल, त्याच्यावर कारवाई करणार, योग्य काम करून घेणार असंही ते म्हणाले. मार्कंडेश्वर देवस्थानासाठी पैसे कमी पडणार नाहीत, असंही ते म्हणाले. 2005 पूर्वीच्या वीस हजार शिक्षकांना मदत करणार असून त्यांना जुनी पेन्शन योजना देण्याबाबतचा निर्णय घेण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये 300 एकरचं सेंट्रल पार्क करण्यात येत आहे. 120 एकर जमीन रेस कोर्सकडून घेतली. कोस्टल रोडच्या बाजूला 180 एकरचे गार्डन करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. रेस कोर्सच्या घोड्यांना त्रास झाल्यामुळं मुंबईतली गाढव ओरडायला लागल्याची, जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं. आरक्षण रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, ते पहा. आरक्षणाला विरोध करण्यासाठी न्यायालयात गेलेला काँग्रेसचा माणूस असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. मराठ्यांना दिलेलं आरक्षण टिकलं, तरच ओबीसी-मराठा यांच्यातील तेढ कमी होईल, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
महामंडळांची स्थापना करणार : वीरशैव कक्कया समाज आर्थिक विकास महामंडळाची तसंच महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची, वारकरी महामंडळाची, प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
हे वाचलंत का :
- विधानपरिषदेत महायुतीचा दबदबा कायम; ठाकरेंचं 'मिलिंद' विजयी, तर शरद पवारांना धक्का - Maharashtra MLC Results 2024
- पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला...! 10 वर्षांनी उधळला विजयाचा 'गुलाल' - mlc election results 2024
- विधानपरिषदेत महायुतीचा दबदबा कायम; ठाकरेंचं 'मिलिंद' विजयी, तर शरद पवारांना धक्का - Maharashtra MLC Results 2024