मुंबई CM Eknath Shinde on Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामाचा आढावा घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबईतील पाच मोठ्या नाल्यांची पाहणी केली. पावसाळ्यात मुंबईतील हिंदमाता, दादर, सायन, मिलन सबवे आदी भागात पाणी साचतं. तिथं पाणी साचू नये, यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. समुद्राला जेव्हा भरती येते, तेव्हा पाणी वस्त्यामध्ये घुसतं. असं पाणी भूमिगत टाक्यांमध्ये सोडण्यात येईल, अशी यंत्रणा उभी करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाले सफाईच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भूस्खलनवर विशेष लक्ष : नाल्यातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्याच आमचा प्रयत्न आहे. तसंच पावसाळ्यात भूस्खलन होऊन मोठं नुकसान होतं. त्या क्षेत्रावर आमचं विशेष लक्ष असेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यामुळं अशा ठिकाणी आम्ही खबरदारी घेऊन लोकांचे एमएमआरडीएच्या वसाहतीत स्थलांतर करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच भूस्खलन क्षेत्रातील लोकांची आम्ही काळजी घेणार असून त्यांना पक्या घरात ठेवलं जाणार असल्याचा दावा शिंदेंनी केलाय. यासाठी लोकांनीही आम्हाला सहकार्य केलं पाहिजं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रेल्वेसोबत डीप क्लीन करणार : मागील वर्षीपासून जमिनीचा हाड बेस लागत नाही तोपर्यंत गाळ काढला पाहिजे, असं मी मनपा कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. कारण फक्त गाळ काढून उपयोग नाही, तर नाल्याच्या तळापर्यंत गाळ काढला पाहिजे. गाळ काठावर न टाकता त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आपण डीप क्लिनिंग रेल्वेसोबत करणार आहोत. रेल्वेच्या अखत्यारीतील असणारे नाले यांची साफसफाई, नाल्यातील गाळ देखील पालिका डीप क्लिनिंगच्या माध्यमातून काढण्याचा आमचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
रस्त्यावर पाणी साचणार नाही : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू आहेत. मेट्रोची काम सुरू आहे. परंतु या कामामुळं कुठेही रस्त्यावर पाणी साचणार नाही. याची खबरदारी घेतली गेली आहे. पावसामुळं मुंबईकरांना त्रास होणार नाही, याबाबत पालिका अधिकारी, कर्मचारी यांना आदेश दिले आहेत. तसंच आगामी काळात मुंबईत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येतील. ज्याच्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल. हे सिमेंटचे रस्ते पुढील दोन ते तीन वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. परंतु आता एमएमआरडीए, मेट्रो, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे हे सर्व मिळून काम करत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
झिरो कॅच्युलिटी मिशन : पावसाळ्यात कुठेही पाणी साचू नये, असं सरकारचं तसंच पालिकेचं मिशन आहे. यामुळं नाले सफाईची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण होतील. यासाठी अधिकारी, कर्मचारी चांगलं काम करत आहे. तसंच रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचून रेल्वेसेवा ठप्प होते. अशावेळी बेस्ट बसेसची मदत घेऊन लोकांना चहा-पाणी देऊन आपापल्या घरी सोडण्याची सोय देखील मागील वर्षापासून सुरी केली आहे. त्याचा मुंबईकरांना फायदा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
तिजोरी साफ केली : नितीन गडकरींना पाडण्यासाठी मोदी-शाह-फडणवीस यांनी प्रयत्न केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुका 20 मे रोजी झाल्या. मात्र, त्यांना आज जाग आली. ते आत्तापर्यंत झोपले होते का? असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तत्कालीन सरकारनं तिजोरी साफ केली. पण आम्ही आता नालेसफाई करत आहोत. कित्येक वर्षापासून फक्त रस्त्यावरती करोड रुपये खर्च केले गेले. यांना सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवायला कोणी थांबवलं होतं? असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळं त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
हा जावई शोध कोणी लावला : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार पाडण्यासाठी आपण यंत्रणेचा वापर केला, असा आरोप सामना अग्रलेखातून आपल्यावर करण्यात आला आहे. महायुतीत सर्व नेते समन्वयानं काम करत आहे. महायुतीत कुणी कुणाचे उमेदवार पाडण्यासाठी काम केलं नाही. उलट आम्ही महायुतीतील उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील, यासाठी अधिक सभा घेतल्या. अधिक प्रचार केला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हे वाचलंत का :
- "बाळासाहेब असते तर यांना जोड्यांनी बडवलं असतं", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल - CM Eknath Shinde Interview
- गडकरींविरोधात मोदी, शाह आणि फडणवीसांचा कट; राऊतांच्या आरोपावर काय म्हणाले महायुतीतील नेते? - Sanjay Raut News
- "लहान मुलगासुद्धा सांगेल की नवनीत राणा..."; राणांच्या विजयावर आमदार बच्चू कडू यांचं भाकीत - Lok Sabha Election 2024