चंद्रपूर Shiva Vazarkar Murder Case Update : युवासेना शहरप्रमुख (ठाकरे गट) शिवा वझरकर याची क्षुल्लक कारणावरून 25 जानेवारीला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोप असलेला शिवसेना वाहतूक शाखा माजी जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून आज (2 फेब्रुवारी) करण्यात आली. त्यामुळें या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे.
काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेतीमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या स्वप्नील काशिकरचे शास्त्रीनगर परिसरात कार्यालय आहे. पूर्वी शिवा वझरकर हा स्वप्नील काशीकरसोबत वाळूचे काम करत होता. मात्र त्यांच्यात पैशांवरुन बिनसलं. शिवानं काशीकर सोबत काम करणं सोडलं. त्यानंतर घटनेच्या दिवशी हिमांशू कुमरे याने शिवाला फोन करत शिवीगाळ केली. तसंच त्यानं शिवाला स्वप्नील काशीकरच्या कार्यालयात येण्याचं आव्हान केलं. शिवा आपल्या काही मित्रांसोबत तिथे गेला असता हा वाद विकोपाला गेला. शिवा काशीकर ह्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि अन्य सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील काशीकरच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त : या प्रकरणाचा संपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तसंच अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याच्या कार्यालयाची आज स्थानिक गुन्हे शाखेनं झडती घेतली असता त्याच्या ऑफीसच्या सोफ्यातून एक लोखंडी तलवार, एक एअर गन, ऑफीस टेबलच्या खाली एक लोखंडी तलवार, एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. हा शस्त्रसाठा पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा कुठून आला, याबाबत सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
हेही वाचा -