मुंबई - आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष राज्यात सरकार स्थापन करणार आहे. त्यांच्या पक्षानं 135 जागा जिंकून वायएसआर काँग्रेस पक्षाचा पराभव केला. त्यांची या राज्यात पवन कल्याण यांच्या जनसेना आणि भारतीय जनता पार्टी बरोबर युती होती. पवन कल्याण यांच्या पक्षाला विधानसभेत 21 जागा मिळाल्या आहेत. तेलुगू देसम, भाजपा आणि जनसेना युतीला 175 पैकी 164 जागा मिळाल्या आहेत. वायएसआर काँग्रेस पक्षाला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. आज आपण चंद्राबाबूंनी केलेल्या एका दृढ निश्चयाबद्दल, प्रतिज्ञेबद्दल, शपथेबद्दल जाणून घेणार आहोत.
निवडणूक जिंकल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही
19 नोव्हेंबर 2021 रोजी जेव्हा चंद्राबाबू नायडू पत्रकार परिषद घेत होते, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यादरम्यान ते मीडिया कर्मचाऱ्यांसमोर रडू लागले. पत्नीवर केलेल्या कमेंटमुळे आपण दुखावल्याचं त्यांनी सांगितलं. चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, अडीच वर्षांत सर्व अपमान सहन केले, पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. यावेळी त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. पत्नीनं कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही, असं ते म्हणाले होते. त्यांचे सासरे एनटी रामाराव मुख्यमंत्री असताना आणि चंद्राबाबू नायडू दीर्घकाळ मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या पत्नीनं कधीही हस्तक्षेप केला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
नायडू 9 जून रोजी घेऊ शकतात चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
175 विधानसभेच्या जागा असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये 88 जागा बहुमतासाठी आवश्यक असतात. परंतु चंद्राबाबूंच्या पक्षानं 135 जागा जिंकुन निर्विवाद बहुमत साध्य केलं आहे. त्यांच्या पक्षाच्या युतीला 164 जागांचं नेत्रदीपक यश मिळालंय. अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू 9 जून रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. लोकसभेतही त्यांच्या पक्षाला 16 जागा मिळाल्या आहेत. तर त्यांच्या युतीला 25 पैकी 21 जागा मिळाल्या आहेत. तेलुगू देसम पक्षाचं देशाच्या राजकारणातलं महत्त्वही त्यामुळं वाढलंय. लोकसभेत एनडीए आघाडीला मिळालेल्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे.
हेही वाचा -
- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी, अमोल कीर्तिकरांचा निसटता पराभव - Lok Sabha Election Results
- राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे पारडे जड, भाजपा-महायुतीला जोर का झटका, पाहा महत्वाचे निकाल - Lok Sabha Election results 2024
- वाराणसीतून पंतप्रधान मोदी, तर रायबरेलीतून राहुल गांधी विजयी - Lok Sabha election results 2024