मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे एका धार्मिक कार्यक्रमात भगर तसंच आमटी खाल्ल्यानं 600 जणांना विषबाधा झाल्याच्या घटना घडली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
600 ग्रामस्थांना विषबाधा : 21 फेब्रुवारी रोजी लोणार तालुक्यातील सोमठाणा गावामध्ये एकादशीनिमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या धार्मिक कार्यक्रमात उपवासासाठी भगर तसंच आमटीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. हाच महाप्रसाद खाल्यानं 600 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुमोटो याचिका दखल केली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारला प्रतिज्ञापत्रासह सविस्तर अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वृद्ध नागरिकांची प्रकृती चिंताजनक : सुनावणीत खंडपीठानं सरकारच्या वकिलांना विषबाधा संदर्भात माहिती विचारली. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, "विषबाधा झालेले सर्व नागरिक बरे झाले आहेत. सर्वांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जवळपास सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, काही वृद्ध नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. परंतु कोणीही अतिदक्षता विभागात सध्या उपचार घेत नाही. संबंधित आरोग्य अधिकारी त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यासाठी कार्यरत असल्याचं त्यांनी न्यायालयात सांगितलंय."
वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा : मात्र, यावर उच्च न्यायालयानं विविध वयोगटातील नागरिकांची माहिती तसंच प्रत्येकाच्या प्रकृतीची वकिलांना विचारणा केली. या सर्वांचा वैद्यकीय अहवाल आवश्यक आहे. या संदर्भात सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा. तसंच प्रतिज्ञापत्राच्या आधारे दहा दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश यावेळी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण : बुलडाणा जिल्ह्यातील सोमठाणा गावात 21 फेब्रुवारी रोजी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी महाप्रसादात भगर, आमटी आयोजकांकडून महाप्रसाद म्हणुन भाविकांना देण्यात आली होती. त्यातून 600 जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळं विषबाधितांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हे वाचलंत का :
- भातसई आश्रमशाळेत 109 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
- पुण्याकडं येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा, रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची प्रवाशी संघटनेची मागणी
- Food Poisoning To Students: शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; सहा विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक