मुंबई MNS BJP Alliance : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. या दृष्टीने भाजपा मुंबईतील सहाही जागा निवडून आणण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. अरविंद सावंत हेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता आहे.
दक्षिण मुंबईत भाजपाकडून तयारी : दक्षिण मुंबई मतदारसंघात भाजपाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाचे आमदार आणि विद्यमान विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे या मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असणार आहेत. त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातसुद्धा केली आहे. मात्र अद्यापही या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही तयारीत : दक्षिण मुंबई मतदार संघावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आपला दावा सांगितला आहे. या ठिकाणी बाळा नांदगावकर इच्छुक आहेत. मात्र भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता असून युतीच्यावतीनं उमेदवार दिला जाणार आहे. याबाबत राज ठाकरे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे.
इंजिन नव्हे कमळावर लढा : या संदर्भात बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, "मी या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तशा पद्धतीची चर्चाही सुरू आहे. मात्र, भाजपाच्यावतीनं या मतदारसंघातून कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जावी, असं सांगण्यात येत आहे. आम्ही मात्र इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवण्यास उत्सुक आहोत. त्यामुळे याबाबत आता भाजपाच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांशी अंतिम चर्चा सुरू आहे. त्यानंतरच या जागेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र, या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असलेला प्रतिसाद पाहता मनसेचा उमेदवार या मतदारसंघात अधिक प्रभावी ठरू शकतो आणि जिंकून येऊ शकतो."
हेही वाचा :
- Bharat Jodo Nyay Yatra: गरिबांवर अन्याय होत असल्यानं 'न्याय' हा शब्द यात्रेत जोडला- राहुल गांधी
- Rahul Gandhi News: राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा'मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचणार; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी
- Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; भाजपावर हल्लाबोल करत म्हणाले, "त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी..."