सातारा : मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशानं वृद्ध नागरिकांना फसवणाऱ्या भोंदूबाबाला दहिवडी पोलिसांनी गजाआड केलं आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे असं भोंदूबाबाचं नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील ओझर इथला रहिवासी आहे. मृत महिलेचा 27 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला मुलगा मीच आहे, असं भासवून वृद्धेची मालमत्ता बळकावण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, नातेवाईकांच्या सतर्कतेमुळं तो फसला आणि भोंदूबाबाच्या हातात बेड्या पडल्या.
महिलेची कौटुंबीक, मालमत्तेची काढली माहिती : माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक गावातील व्दारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ हा इयत्ता 8 वी मध्ये असताना 1997 साली घरातून निघून गेला. आपला मुलगा कधी तरी परत येईल, या आशेवर ती जगत होती. मागील नऊ-दहा वर्षांपासून एकनाथ शिंदे हा भोंदूबाबा भिक्षा मागण्यासाठी गावात येत होता. या दरम्यान त्यानं व्दारकाबाईच्या कुटुंबाची आणि मालमत्तेची माहिती घेतली. तिचा मुलगा घर सोडून गेला असून तिला तीन एकर जमीन असल्याचं त्याला समजलं.
नातेवाईकांमुळं पोलिसांच्या तावडीत सापडला भोंदूबाबा : एकनाथ शिंदे हा वद्धेला वरचेवर भेटून मीच तुमचा मुलगा असल्याचं सांगत होता. अशातच 9 डिसेंबर 2023 रोजी वृद्धापकाळानं द्वारकाबाईंचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी 27 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचं वर्षश्राद्धही घातलं. त्यानंतर मुलगा या नात्यानं 11 डिसेंबर 2024 ला तिचं वर्षश्राद्ध घालण्याचं भोंदूबाबानं ठरवलं. ही माहिती कळताच नातेवाईक त्याठिकाणी पोहोचले. त्यांना भोंदबाबाचा संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं.
पोलिसी खाक्या दाखवताच भोंदूबाबानं दिली कबुली : दहिवडी पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच आपलं खरं नाव एकनाथ रघुनाथ शिंदे असल्याचं त्यानं सांगितलं. तसंच व्दारकाबाईच्या नावे असलेली तीन एकर जमीन बळकावण्याच्या हेतूनं तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर याची कागदपत्रं काढली. त्याचा फोटो, नाव, पत्ता वापरुन आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते, एटीएम काढल्याची कबुलीही दिली. दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूबाबाला गजाआड केलं. आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केलं आहे.
हेही वाचा :
- Female Sacrifice for Black Magic : गुप्तधनासाठी बळी देण्याकरता चक्क बापाकडे केली 16 वर्षांच्या मुलीची मागणी; गुन्हा दाखल
- Financial Fraud With Woman: तंत्रमंत्राद्वारे मतिमंद दिराच्या उपचाराचा दावा करत महिलेची लाखो रुपयांनी फसवणूक
- Bhondubaba Raped In Nashik : येवल्यात भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार केला