अमरावती MP Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज सायंकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजपामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळं शुक्रवारी रात्री अमरावती शहरातील राजापेठ चौकात नवनीत राणांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. "मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही" असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं आमरावती मतदारसंघात लोकसभेची निवडणूक (Lok Sabha elections) रंगतदार होणार आहे.
पोस्टरबाजीमुळं खळबळ : अमरावती लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार, असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा या भाजपामध्ये शनिवारी अधिकृत प्रवेश घेण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. नवनीत राणा याच भाजपाच्या अधिकृत उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघातून राहतील, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा यांच्या शनिवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याकडं सर्वांचं लक्ष लागलं असताना राजापेठ उड्डाण पुलाच्याखाली झळकलेल्या पोस्टरमुळं खळबळ उडाली आहे.
स्थानिक भाजपा नेत्यांचा राणांना विरोध : आमदार रवी राणा तसंच खासदार नवनीत राणा यांच्यासोबत भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्यासह काही मोजक्याच भाजपा नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळं स्थानिक भाजपाचे नेते राणा यांच्यावर नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू आहे. गत दहा वर्षात आमदार रवी राणा यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत संघर्ष अमरावतीकर पाहात आले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राणा दांपत्यासोबत अतिशय चांगले संबंध असल्यामुळं भाजपाचे स्थानिक नेते राणा यांच्या विरोधात उघडपणे बोलत नाहीत. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा राणांपासून दूर राहिलेलं बरं, असा सल्ला प्रदेश तसंच राष्ट्रीय पातळीवरील आपल्या नेत्यांना वारंवार दिला आहे. असं असताना आता नवनीत राणा यांनी भाजपाच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवल्यास आमची हरकत नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे. खासदार नवनीत राणा यांची भाजपामध्ये जाण्याची तयारी जवळपास निश्चित असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड खदखद उफाळून येण्याची शक्यता आहे.
कोणी लावलं पोस्टर : "मोदी जी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही" असं 'मी अमरावतीकर' म्हणून शनिवारी रात्री राजापेठ उड्डाणपुलाखाली लावण्यात आलेल्या या पोस्टरमुळं खळबळ उडाली आहे. हे पोस्टर नेमकं कोणी लावलं, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या पोस्टरमुळं अमरावती लोकसभा मतदारसंघात चांगलाच धुमधडाका रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
हे वाचलंत का :