मुंबई Badlapur Sexual Abuse Case : काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले. या बदलांमध्ये बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली. त्यामुळे निलंबन करण्यात आलेलं असताना शुभदा शितोळे यांच्या झालेल्या बदलीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निवडणूक आयोगानं दिले होते अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तीन वर्ष एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. ठाणे शहर येथील पोलीस निरीक्षक अजय आपळे, नंदकुमार कैचे, गंगाराम वळवी, महादेव कुंभार, स्वाती पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे आणि संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं नाशिक शहरातील पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर, अशोक शरमाळे, कुंदन जाधव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात बदली करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस निरीक्षक ब्रम्हा संताराम गिरी, गौतम केशव पातारे, राजेंद्र नारायण होळकर, जनार्दन सुभाष साळुंके यांची अमरावती शहरात बदली करण्यात आली आहे. अमरावती शहरातील पोलीस निरीक्षक रेखा दत्तात्रय लोंढे यांची छत्रपती संभाजीनगर शहरात बदली करण्यात आली आहे.
निलंबन काळात बदली केल्यानं चर्चांना उधाण : बदलापूर प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची मुंबईत बदली करण्यात आल्यानं मोठी चर्चा करण्यात येत आहे. निलंबन करण्यात आलेलं असताना पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या झालेल्या बदलीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बुधवारी राज्य सरकारनं बदलापूर प्रकरणी शुभदा शितोळे यांच्यासह इतरांच्या निलंबनाचे आदेश तातडीनं काढले. मात्र त्यानंतर गुरुवारी बदली कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ठाण्यावरुन मुंबईला बदली झालेली असताना निलंबनाचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
वर्षांपूर्वीच पुण्यावरुन झाली होती बदली : निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची एका वर्षांपूर्वीच उल्हासनगर झोनमधील एक नंबर पोलीस स्टेशनमध्ये सेकंड पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यावरुन बदली झाली. वर्षभर उल्हासनगर पोलीस ठाण्यात कामकाज केल्यानंतर तीन-चार महिन्यापूर्वीच त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन दिलं गेलं. त्यांची नेमणूक बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली असून त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार, खून, दरोडे, घरफोड्या अशा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विशेषत: लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या दोन मोठ्या घटना घडून गेल्या आहेत. यापैकी एका घटनेत त्यांच्यावर तीन दिवसांपूर्वीच निलंबनाची कारवाई झाली असूनही आज त्यांची ठाणे कंट्रोलवरुन मुंबई शहरामध्ये बदली झाली आहे. एकंदरीतच शुभदा शितोळे यांच्यामागं सत्ताधारी पक्षातील राजकीय वजनदार नेता असल्याची चर्चा विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांची चौकशी न करताच त्यांची बदली करण्यात आल्यानं यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा :
- न्यायालयानं दखल घेतल्यानंतर जबाब नोंदवले; मुंबई उच्च न्यायालयानं पोलीस तपासावर ओढले ताशेरे - Badlapur Sexual Assault Case
- बदलापूर अत्याचार प्रकरण ; नराधम अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, बदलापुरात तणावपूर्ण शांतता - Badlapur Minor Girl Sexual Assault
- तर जनतेचा उद्रेक होणारच, महाराष्ट्र बंद राजकीय नाही : उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, महाराष्ट्र बंदची हाक - Uddhav Thackeray On Badlapur Case