मुंबई Siddhivinayak Mumbai : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये गुढीपाडवा मुहूर्तावर 'श्रीं'ना अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव मंगळवार 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या लिलावात हार, साखळी, नाणी, वळी, माळ असे विविध प्रकारचे सोन्याचे अलंकार ठेवले जाणार आहेत. एकंदरीत सव्वादोनशे अलंकारांचा समावेश या लिलावात असणार आहे. तरी सर्व भाविकांनी या लिलावामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी वीणा मोरे पाटील यांनी केलं आहे. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांसाठी विक्रीला चांदीची नाणी देखील ठेवण्यात येणार आहेत.
कशा प्रकारे असेल चांदीचे नाणे : यावेळी लिलावामध्ये चांदीच्या नाण्यांची विक्री देखील भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला श्री सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती तर दुसर्या बाजूला 'श्री'ची प्रतिमा आहे. अशा प्रकारची नाणी 11 ग्रॅम, 21 ग्रॅम आणि 51 ग्रॅम 999.99 शुद्ध चांदीची नाणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांकरिता विक्रीसाठी ठेवणार आहे.
सिद्धिविनायक मंदिराविषयी माहिती : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सुप्रसिध्द मंदिर बृहन्मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि जागृत देवस्थान आहे. लक्षावधी भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान पुरातन असून कार्तिक शुद्ध चतुर्दशी शालिवाहन शके १७२३ (सन १८०१) मध्ये पहिला जीर्णोद्धार/नूतनीकरण विधीपूर्वक लक्ष्मण विठू पाटील यांच्या मार्फत झाला असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. श्री सिद्धिविनायक हे मंदिर गेल्या दोनशे वर्षांपासून येथे अस्तित्वात असल्याचे यावरून स्पष्ट होते. मुंबईतील बाणगंगा संकुलात अगदी अशीच संगमरवरी मूर्ती अस्तित्वात आहे. या दोन्ही मूर्ती एकाच कारागिराने घडवल्या असाव्यात. बाणगंगा देवस्थान संकुल ५०० वर्षांहून अधिक जुने आहे, हे लक्षात घेता प्रभादेवी मंदिरातील मंदिराची रचना सुमारे ५०० वर्षे इतकी पुरातन असावी असे म्हणता येईल. सन १९३६ या वर्षांपासून असून मंदिरातील पूजाअर्चा आणि अनुशंगिक व्यवस्था गोविंदराव फाटक यांच्याकडून करण्यात येऊ लागली. “श्री संत जांभेकर महाराज” यांच्या आदेशावरून फाटक हे काम करू लागले.
हेही वाचा :
- अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याला नोटीस; भाजपानं केली होती निवडणूक आयोगाकडं तक्रार - Election Commission Notice to AAP
- काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; जातनिहाय जनगणना, 50 टक्क्यांवर आरक्षण वाढीसाठी करणार घटनादुरुस्ती - Congress Party Releases Manifesto
- काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी; सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांचा सल्ला - Sanjay Raut