ठाणे : वादग्रस्त पोलीस चकमकीत मृत्यू झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात ठाणे न्यायालयाने मृतक अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे आणि आई अलका शिंदे यांना समन्स पाठविलेत. वादग्रस्त अक्षय शिंदे प्रकरणाची एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू असतानाच ठाणे न्यायालयात दाखल प्रकरणात ठाणे प्रथम वर्ग- 1 च्या न्यायालयाने मृतक अक्षय शिंदे याच्या खटल्यात साक्षीदार असलेले अण्णा शिंदे आणि अलका अण्णा शिंदे यांना न्यायालयाने हाजिर होण्याचे आदेश दिलेत. अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांना 11 ऑक्टोबरला मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत समन्स बजावण्यात आलेत. या समन्समध्ये वादग्रस्त प्रकरणात साक्षीदार असलेले अण्णा आणि अलका शिंदे यांनी 14 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता न चुकता ठाणे प्रथम वर्ग-1 च्या न्यायालयात उपस्थित राहावे, असे समन्स बजावलेले आहेत.
चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन : खरं तर बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन केलाय. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगानं तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश सरकारनं दिलेत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत 23 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झालाय. अक्षय शिंदेला कोर्टातून घेऊन जात असताना मुंब्रा येथे ही घटना घडली. या घटनेबाबत घडलेल्या सर्व घटनांचा क्रम, तसंच आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर कसा झाला, याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारनं न्यायिक आयोग स्थापन केलाय.
एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी : विशेष म्हणजे आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत उपाध्याय यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात यावं, अशी मागणी केली होती. या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.
आपटे आणि कोतवाल यांना अटक : दुसरीकडे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मागील दीड महिन्यापासून फरार असलेले शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना ठाणे क्राइम ब्रँचने अटक केलीय. पुढील चौकशीसाठी त्यांना एसआयटी पथकाकडं वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली होती. शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे आणि संस्थेचा सचिव उदय कोतवाल हे दोघं मागील दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर या प्रकरणात गुन्ह्यातील फरार आरोपींकडं पोलिसांनी मोर्चा वळवला होता. अखेर ठाणे गुन्हे शाखेनं तुषार आपटे आणि कोतवाल यांना अटक केल्यानंतर आता याच प्रकरणात अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना समन्स बजावण्यात आलाय.
हेही वाचा :