पुणे: पुण्यात काही दिवसांपूर्वी एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने कंपनीतील कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात तरुणीच्या आईने आपल्या मुलीच्या बॉसवर कामाचा अत्याधिक दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं याची गंभीर दखल घेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस जारी करून चार आठवड्यांत अहवाल मागवला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अॅना सेबस्टियनच्या आई-वडिलांशी फोनवरून संवाद साधला. याबाबत एक्स मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींनी माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले,"अशा कठीण परिस्थितीत अॅनाच्या आईनं धैर्य आणि निस्वार्थीपणा दाखवित कामाचे ठिकाण सर्वांसाठी सुरक्षित आणि चांगले स्थान असण्याची इच्छा व्यक्त केली. हा दु:खाचा क्षण मोठा बदल घडवून आणेल, याबाबत त्यांना मी खात्री दिली आहे. काँग्रेसह माझ्याकडून वैयक्तिक सहकार्य करण्याची वचनबद्ध असल्याचं सांगितलं आहे." काँग्रेसचे नेते प्रवीण चक्रवर्ती म्हणाले, " अॅनाच्या स्मरणार्थ देशभरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची राहुल गांधींनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सूचना केल्या आहेत."
I spoke with the heartbroken parents of Anna Sebastian, a bright and ambitious young professional whose life was tragically cut short by toxic and unforgiving work conditions.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 21, 2024
In the face of unimaginable grief, Anna's mother has shown remarkable courage and selflessness, turning… pic.twitter.com/XY9PXbYAIK
कंपनीनं फेटाळले आरोप- केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी सीए अॅना सेबस्टियनच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचं गुरुवारी सांगितलं. जास्त वेळ काम, कामाच्या तणावामुळे मुलीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा आरोप करत पीडितेच्या आईनं कंपनीला पत्र लिहिले. हे आरोप संबंधित कंपनीनं फेटाळले आहेत. "अॅनाच्या मृत्यूनंतर तिच्या अंतिमसंस्कारालादेखील कुणी उपस्थित राहिले नव्हते. तेव्हा अशी कंपनी मानवी हक्कांबद्दल कशी बोलू शकते," असा सवाल पीडितेच्या आईने केला.
मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (NHRC) अॅना सेबॅस्टियन पिरायिलच्या मृत्यूची स्वत:हून दखल घेतली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं म्हटलं, " तरुण कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी भेडसावणारी आव्हाने, मानसिक तणाव, चिंता आणि झोप न लागणे, अव्यवहार्य लक्ष्यांचा पाठलाग करावा लागतो. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. टाईमलाइनमुळे त्यांच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होते. आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण प्रदान करणे हे प्रत्येक कंपनीचं प्रमुख कर्तव्य आहे.
चार आठवड्यात द्यावा लागणार अहवाल- कंपनीनं काम करणाऱ्या प्रत्येकाला सन्मानानं आणि निष्पक्षतेने वागविण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व संबंधितांनी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सूचित केले आहे. त्यानुसार त्यांनी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. आयोगाला तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित तात्काळ प्रकरणात करण्यात आलेल्या तपासाची माहितीदेखील जाणून घ्यायचाी आहे. याशिवाय, आयोगाला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत? काय प्रस्तावित उपाययोजना केल्या आहेत? हेदेखील जाणून घ्यायचे आहे.
कामाचा अत्याधिक दबाव- मृत तरुणीची आई अनिता ऑगस्टीन यांनी कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं, " माझी मुलगी अॅना ही नोव्हेंबर 2023 मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. ती 19 मार्च 2024 रोजी पुण्यातील ईवाय या कंपनीत कामाला लागली. पण 4 महिन्यांतच 20 जुलै रोजी तिच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर आली. कंपनीत नोकरीस लागल्यानंतर लगेचच तणाव, नवे वातावरण आणि प्रदीर्घ काळापर्यंत काम केल्यामुळे ती चिंता आणि तणावाच्या गर्तेत सापडली होती. पण त्या स्थितीतही ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे खूप काम होते. पण आराम करण्यासाठी सहसा फारच कमी वेळ असायचा. ती तणावात गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत काम करत होती. तिच्यावर कामाचा अत्याधिक दबाव टाकण्यात येत होता," असा आरोप पीडितेच्या आईनं या पत्रातून केला आहे.