मुंबई -: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष माहीम विधानसभा मतदारसंघाकडे लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने हा मतदारसंघ चर्चेत आलाय. आज अमित ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शनदेखील करण्यात आलंय.
दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात आरपारची लढाई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सक्रिय राजकारणात पदार्पण करीत आहेत. या जागेवर शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, भाजपाने शिंदे सेनेला अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. माहीममधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत, शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात आहेत. यातील अमित ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी आपल्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात आपण आरपारची लढाई लढण्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी माध्यमांना दिलीय.
सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याच्या चर्चा: माहीमच्या जनतेने मला निवडून देऊन काम करण्याची संधी दिल्यास मी आपल्या परिसराचा कायापालट करेन, असे अमित ठाकरे म्हणालेत. अमित ठाकरे सांगतात की, त्यांना विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करायचंय. तसेच वडिलांप्रमाणे त्यांना मराठी भाषा आणि मराठी बांधवांसोबतच हिंदुत्वाची विचारधारा पुढे न्यायची आहे. मंगळवारी 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, या विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांपैकी आतापर्यंत एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. तर, ठाकरेंचे उमेदवार महेश सावंतदेखील आज अर्ज भरणार आहेत. यातील सध्याचे विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याच्या चर्चा आहेत. तर समाधान सरवणकर यांनी सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे जाहीर केलंय. शनिवारी सदा सरवणकर यांनी सोमवारी (आज) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता ते मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे या विधानसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -