पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळं सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लहान मुलांमध्येही आजाराचं प्रमाण वाढलं आहे. वातावरण बदलाचा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशावेळी आई वडिलांनी लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबत बालरोग तज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी मार्गदर्शन केलं आहे.
रूग्णांच्या संख्येत वाढ : "सध्या पुणे शहरात वातावरणात बदल पाहायला मिळत असून सकाळी थंडी दुपारी ऊन आणि परत रात्री थंडी पाहायला मिळत आहे. यामुळं व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन तसंच त्वचेचे आजार, थंडी, ताप, खोकला, त्वचेचे आजार, डोळ्यांना खाज येणं असे आजार लहान मुलांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. तसंच आठ ते दहा दिवसांपूर्वी रूग्णांची संख्या ही कमी होती. मात्र या वातावरण बदलामुळं रूग्णांची संख्या वाढली आहे, यात लहान मुलांचा जास्त समावेश आहे. तसंच नवजात बालकांमध्ये शरीराचं तापमान एकदम कमी होणं याच देखील प्रमाण हे वाढलं आहे," अशी माहिती यावेळी बालरोग तज्ञ तसंच कमला नेहरू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता सांगडे यांनी दिली.
अशी घ्या काळजी : "सध्या वातावरण बदलामुळं लहान मुलांमध्ये आजार वाढत आहे. यासाठी सकाळच्या वेळेस थंडी असताना उपदार कपडे, टोपी, स्वेटर तसंच मास्क देखील मुलांना घातलं पाहिजे. मुलांना या काळात सकस आहार आणि प्यायला कोमट पाणी दिलं पाहिजे. त्वचेची काळजी घेत असताना मॉश्चरायजर, बॅाडीलोशन, व्हॅसलीन लावावं त्यामुळं त्वचेचा कोरडेपणा टाळता येतो. तसंच डोळ्यांना खाज आली तर, डोळ्यांना हात न लावणे, त्याचं इन्फेक्शन वाढू देऊ नये. पालकांनी नवजात बालकांना बाहेरील हवा येईल, अशा ठिकाणी ठेवू नये. लहान मुलांमध्ये थंडी, ताप, खोकला तसंच त्वचेला, डोळ्यांना खाज आल्याचं आढळल्यास तात्काळ त्यांनी बालरोग तसेच डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे," असं डॉ.स्मिता सांगडे यांनी सांगितलं.
हेही वाचा