कोल्हापूर Kolhapur News : लक्षतीर्थ वसाहत येथील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी आज सकाळी गेलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला. महानगरपालिकेला घेराव घालून, महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले. तर ती बेकायदेशीर वास्तू आजच पाडण्यासाठी कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. त्यामुळं आज दिवसभर वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. रात्री उशिरापर्यंत या भागात तणाव होता.
शालेय बसवर दगडफेकीने पुन्हा तणाव : सायंकाळी दसरा चौक येथील मैदानावर नगर जिल्ह्यातील आलेल्या शालेय बसमधील विद्यार्थ्यांना कोल्हापुरातील या तणावाविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळं हे विद्यार्थी जय श्रीरामच्या घोषणा देत होते. त्यामुळं बाजूलाच जमलेल्या समाजकंटकांनी अचानक बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी तातडीने धाव घेत लाठीचार्ज करून समाजकंटकांना पांगवले. समाजकंटकांनी जाताना मैदानावरील भाविकांच्या पार्किंग मधील दोन चार चाकी वाहनावरही दगडफेक केली. तर दगडफेकीमुळे शालेय विद्यार्थी घाबरले होते. यावेळी काही समाजकंटकाकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित समाजकंटकांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती, शहर पोलीस उपधीक्षक टिके यांनी दिलीय. तसंच अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
अनधिकृत बांधकामाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा अर्जही नामंजूर : अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी महानगरपालिके विरुध्द दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये या संस्थेचा मनाई अर्ज नामंजूर केल्यानंतर महानगरपालिकेने या अनधिकृत बांधकामावर आज कारवाईचे नियोजन केले होते. दरम्यान कारवाई वेळी स्थानिकांनी विरोध केला. जिल्हा न्यायालय एस. एस. तांबे यांच्या कोर्टात किरकोळ दिवाणी अपील दाखल केल्याचे सांगून मूळ अपिलाच्या निकालापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेने कोणतीही कारवाई करुन नये,अनधिकृत बांधकामाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवावी अशा आशयाच्या मागणीचा अर्ज विरोधकांनी दाखल केला. त्यावर दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद झाला. गुणदोषावर अर्ज नामंजूर केल्याचं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
२५० पोलीस रस्त्यावर : राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त लक्षतीर्थ वसाहत परिसरात तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह अधिकारी दिवसभर थांबून होते. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रमुख चौकातही पोलीस तैनात होते. इतर धार्मिक स्थळांना बंदोबस्त दिला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव दिसत होता.
हेही वाचा -