मुंबई Abhishek Ghosalkar Murder Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आता पोलीस वेगानं सूत्रं हालवत आहेत. पोलिसांनी आज सकाळी मेहुल पारेख याला ताब्यात घेतलं. तो आरोपी मॉरिस नरोनाचा कट्टर समर्थक मानला जातो. त्यानं हत्येपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या ऑफिस बाहेर रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मॉरिसचा अंगरक्षक ताब्यात : एमएचबी पोलिसांनी मेहुलसह रोहित शाहू उर्फ रावण आणि मॉरिसचा अंगरक्षक मिश्रालाही ताब्यात घेतलं आहे. मॉरिसनं ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, ती पिस्तूल मिश्राच्या नावे रजिस्टर्ड होती. मॉरिसनं आधी अभिषेक घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर पिस्तुलात पुन्हा दोन गोळ्या भरून स्वतःवर गोळीबार केला. रोहित शाहूला चौकशीनंतर सोडण्यात आलंय.
मॉरिसची पिस्तूल जप्त : मॉरिस नरोनांनं 8 फेब्रुवारीला फेसबुक लाइव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर मॉरिसनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मॉरिसची पिस्तूल जप्त केली. एमएचबी पोलिसांकडून हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलंय.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी : अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. ते ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. तसेच ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चांगलेच सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्या अशा मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून सततच्या घडत असलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हे वाचलंत का :