ठाणे Child Accused Escaped Police : पोक्सो व विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १७ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालसुधारगृहात गाडीनं नेण्यात येत होतं. घेऊन जात असतानाच चालत्या वाहनातून उडी मारून तो फरार झाल्याची घटना समोर आली. ही घटना भिवंडी तालुक्यातील सावद नाका येथील परिसरातील रस्त्यावर घडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यातुन फरार झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलीस पथकानं त्याचा शोध सुरू केला. मात्र, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली.
काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीण तालुक्यातील टिटवाळा नजीक असलेल्या बनेली गावच्या हद्दीत फरार १७ वर्षीय विधीसंघर्ष बालक कुटूंबासह राहतो. त्यातच तीन दिवसापूर्वी त्याने याच भागात राहणाऱ्या एका अल्पवीयन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे त्याला ३ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
खासगी गाडीनं नेत होते : त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी एपीआय मल्लकाअर्जुन कारामुंगे आणि पोलीस हवालदार दिगांबर गांगर्डे हे दोघे ताब्यात असलेल्या विधीसंघर्ष बालकास ४ सप्टेंबर रोजी बाल न्यालायात हजर करून त्याला भिवंडी शहरातील बालसुधार गृहात एका खासगी चारचाकी वाहानं घेऊन जात होते.
बालक गेला पळून : दरम्यान, प्रवासात असताना त्याला घेऊन जाणारे खासगी वाहन भिवंडी तालुकयातील सावद नाका येथील परिसरातील रस्त्यावरून जात असतानाच त्या विधीसंघर्ष बालकानं वाहनातून उडी मारून पळून गेला. याप्रकरणी ४ सप्टेंबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यातील विधीसंघर्ष बालक फरार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांकडून शोध सुरू : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता, "कल्याण तालुका पोलिसांच्या ताब्यात असलेला विधीसंघर्ष बालक फरार झाल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस त्याला एका खासगी वाहनानं घेऊन जात असतानाच, सावद नाका भागात वाहन धीम्या गतीनं जात असल्याचं पाहून विधीसंघर्ष बालकाने वाहनातून उडी मारून पळून गेला" असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच २४ तास उलटूनही त्याचा अध्यापही थांगपत्ता लागत नसून पोलीस पथक त्याचा शोध घेत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - भिवंडीत कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांसह खाद्यपदार्थांची विक्री; दोघांवर गुन्हा दाखल - Bhiwandi Crime