बीड Beed Zilla Parishad Schools : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडताना पाहायला मिळत आहेत. अनेक धोकादायक इमारतीमध्ये शिक्षकांना ज्ञानदान करावे लागत आहे तर विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. एकीकडे बीडच्या कारेगव्हण या गावातील जिल्हा परिषदेची शाळा ऊसतोड मजुरांनी एकत्र येत लोकवर्गणी करून चांगली केली. विद्यार्थ्यांसाठी गावातच शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि आज त्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करताना पाहायला मिळत आहेत. ही गावे बीड जिल्ह्यात आहेत तर एकीकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये बसायलासुद्धा जागा नाही. अशासुद्धा शाळा याच बीड जिल्ह्यात आहेत; परंतु अनेक धक्कादायक वर्गखोल्या देखील याच बीड जिल्ह्यात आहेत. मात्र प्रशासन या धक्कादायक वर्गखोल्यांकडे लक्ष देईल का? आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळणार का, असाच खडा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
खोल्या दुरुस्तीचे जि.प.तर्फे आश्वासन : काही शाळांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे संगणक, ई लर्निंग, वीज उपकरणे बंद असल्याने डिजिटल शैक्षणिक नुकसान होत आहे. भविष्यात शाळांच्या दुरुस्ती व पुन: बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असं आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी दिले.
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2474 शाळा : बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2474 शाळा असून यात 2415 शाळा प्राथमिक तर 59 शाळा माध्यमिक आहेत. जिल्ह्यात 11 तालुक्यातील 349 शाळांच्या 592 वर्गखोल्या धोकादायक असून मोठा पाऊस अथवा वादळवारे आल्यास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीची दुरावस्था असून कुठे भिंती कुजलेल्या अवस्थेत तर कुठे छत उघडे पडलेले तर कुठे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शाळा, वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने शालेय मुलांची अडचण होत आहे. दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
तालुका निहाय मोडकळीस आलेल्या शाळा : आष्टी तालुका 80 शाळांमधील 119 वर्गखोल्या, अंबेजोगाई तालुक्यातील 16 शाळांमधील 30 वर्गखोल्या, बीड तालुक्यातील 28 शाळांमधील 37 वर्गखोल्या, धारूर तालुक्यातील 17 शाळांमधील 30 वर्गखोल्या, केज तालुक्यातील 19 शाळांमधील 22 वर्गखोल्या, गेवराई तालुक्यातील 62 शाळांमधील 125 वर्गखोल्या, माजलगाव तालुक्यातील 13 शाळांमधील 26 वर्गखोल्या, परळी तालुक्यातील 46 शाळांमधील 88 वर्गखोल्या, पाटोदा तालुक्यातील 31 शाळांमधील 40 वर्गखोल्या, शिरूर तालुक्यातील 24 शाळांमधील 32 वर्गखोल्या, वडवणी तालुक्यातील 13 शाळांमधील 43 वर्गखोल्या. एकूण 349 शाळांमधील 592 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असून त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.
छत पडलेल्या वर्गात ज्ञानार्जन : बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत पिंपळवाडी केंद्र अंतर्गत वायकर वस्ती येथील शाळेच्या एका वर्गाचे छत पूर्णपणे कोसळले आहे. सध्या ज्या वर्गात मुलं ज्ञानार्जन करत आहेत त्या वर्गातील छत पडण्याच्या अवस्थेत असून मुलांच्या जिवीताला धोका आहे. शेतकरी ऊसतोड मजुरांच्या लेकरांनी पावसाळ्यात शाळा उघड्यावर कशी शिकायची? असा संतप्त सवाल शिक्षण विभागाला विचारला जात आहे.
497 शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 772 शाळांना वीजपुरवठाच नाही तर जिल्ह्यातील 497 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे 1 कोटी 3 लाख 45 हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे संगणक, ई लर्निंग, एलईडी टीव्ही, डिजिटल बोर्ड तसेच विजेची उपकरणे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच बहुतेक शाळात अंधार आहे. अनेक शाळांच्या मागील भागात गवत आणि झाडेझुडपे असतात. त्यातून कधी विंचु तर कधी सापही शाळेत येतात. अंधार असल्याने अनेकदा दिसत नाहीत. वीज असेल तर अशा प्रकारचा धोका होणार नाही. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.