ठाणे Dog Bite Death In Bhiwandi : भिवंडी शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची मोठी दहशत पसरली आहे. खळबळजनक बाब म्हणजे दोन दिवसात 135 नागरिकांना त्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. यापैकी एका चार वर्षाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं भिवंडी शहरात पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे भिवंडी महानगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारे श्वान निर्बिजीकरण केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची हजारोच्या संख्येत वाढ झाली. त्यामध्येही पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढीस लागल्याचं या घटनेनंतर दिसून आलं आहे.
भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास : भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना, दुचाकी चालकांना होत आहे. या भटक्या कुत्र्यांपैकी काही पिसाळल्यानं अनेकांना दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागलेल्या आहेत. 7 आणि 8 जुलै या दोन दिवसात तब्बल 135 जणांना श्वान दंश झाल्याची घटना घडली होती. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये सर्वाधिक लहान मुलामुलींचा समावेश असून त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर होती. खळबळजनक बाब म्हणजे गेल्या जून महिन्यामधील तीस दिवसात 886 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.
एकाच दिवशी 60 नागरिकांना कुत्र्यांनी घेतला चावा : 7 जुलै रोजी भिवंडी शहरातल्या कामतघर परिसरात 60 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलं. तर शांतीनगर भागात आठ जुलै रोजी 45 जणांना एकाच भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलं. या गंभीर जखमीमध्ये शांतीनगर भागात राहणाऱ्या लायबा शेख या चार वर्षीय मुलीचा समावेश होता. सुरुवातीला तिला भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं दुसऱ्या दिवशी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिच्या जखमांवर शस्त्रक्रिया करण्यात येऊन तिला तीन दिवसात घरी सोडण्यात आलं. मात्र तीन दिवसापूर्वीच तिची पुन्हा प्रकृती गंभीर झाल्यानं तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र 25 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
पावसाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न : यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी 8 जुलै म्हणजे घटनेच्या दिवशी पावसाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यावर महापालिका काहीच उपाययोजना करीत नसल्यानं प्रश्न उपस्थित केला. त्यावर सभागृहात चर्चा होऊन महापालिकेला उपाययोजनेसाठी निर्देशही दिल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे. मात्र त्यावर काहीच उपाययोजना पालिका अधिकाऱ्यांनी केली नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. त्यासाठी 27 ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी यावेली सांगितलं. तर मृत मुलीचे आजोबा यांनी यापूर्वीही पालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी निवेदन दिलं होतं. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्यानं माझ्या नातीला कुत्रानं चावा घेऊन मारलं तसेच ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नातीवर योग्य उपचार केले नसल्यानंच मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा :
- ठाण्यात श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, 1 जुलैपासून कायद्यात केलेल्या बदलामुळं प्राणी प्रेमी नाराज - Unnatural abuse on a dog
- गोरेगाव येथील 'नेस्को एक्झिबिशन सेंटर'मध्ये 26 भटक्या श्वानांचा मृत्यू, पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल - FIR In Stray Dog Died Case
- इमारतीच्या टेरेसवरुन श्वान अंगावर पडल्यानं तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद - Dog Fall On Girl