सानो (जपान) Worst T20 Record : टी-20 क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम झाले आहेत, ज्याचा खेळाडू आणि संपूर्ण संघाला अभिमान आहे. पण असे काही नकोशे रेकॉर्ड्सही तयार होतात, ज्याची लाज वाटते. 20-20 षटकांच्या या खेळात अनेक वेळा रेकॉर्डब्रेक धावा केल्या जातात. परंतु कधीकधी संघ खूप कमी धावा करतात.
जपानचा 205 धावांनी विजय : बुधवारी जपान आणि मंगोलिया यांच्यात एक टी-20 सामना झाला. हा सामना सानो इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात जपान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 7 गडी गमावून 217 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना संपूर्ण मंगोलियन संघ अवघ्या 12 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे संघाच्या 7 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. अशा प्रकारे जपाननं हा सामना तब्बल 205 धावांनी जिंकला आहे. मंगोलियानं केलेल्या 12 धावा ही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. अशा परिस्थितीत मंगोलियाच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेलाय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम आयल ऑफ मॅन संघाच्या नावावर आहे, जो स्पेनविरुद्ध अवघ्या 10 धावांवर बाद झाला होता. हा लज्जास्पद विक्रम 2023 मध्ये झाला होता. आता दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम मंगोलियाच्या नावावर झालाय.
सात फंलदाज शुन्यावर बाद : मंगोलियाचे दोन्ही सलामीवीर मोहन विवेकानंदन आणि नामसराय 0 आणि 2 वर बाद झाले. यानंतर एक एक फलंदाज बाद होणे सुरु झाले. हा सामना नव्हे तर काही विनोद चालू आहे असं वाटलं. त्यांचे तब्बल 7 फलंदाज खातं न उघडताच माघारी परतले. त्यापैकी 6 बाद तर 1 नाबाद राहिला. या फलंदाजांना एक धाव काढण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. संघासाठी सर्वाधिक 4 धावा तुम सुम्या यानं काढल्या. मंगोलियाच्या खराब फलंदाजीचा परिणाम असा झाला की संघानं 8.2 षटकं फलंदाजी केली परंतु 1.44 च्या धावगतीनं संघ केवळ 12 धावांवर सर्वबाद झाला.
कॅटो स्टॅफोर्डनं अर्धा संघ तंबुत पाठवला : जपानचा वेगवान गोलंदाज काझुमा काटो-स्टाफोर्डनं मंगोलियाचा निम्मा संघ तंबुत पाठवला आणला. त्यानं 3.2 षटकात 7 धावा देत एकूण 5 बळी घेतले. याशिवाय अब्दुल समद आणि माकोटोनं 2-2 बळी घेतले, तर बेंजामिनला 1 बळी मिळाला. दुसरीकडे, सबौरिश रविचंद्रननं जपानच्या डावात 39 चेंडूत सर्वाधिक 69 धावा केल्या. त्यानं 6 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय कर्णधार केंडल काडोवाकी फ्लेमिंगनं 32, इब्राहिम ताकाहाशीनं 31 धावा केल्या. मंगोलियाकडून झोजावखलान शुरेन्टसेटसेगने सर्वाधिक 3 बळी घेतले.
हेही वाचा :