नई दिल्ली : India vs Africa : भारतानं उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव करत ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकांत सात गडी गमावून 244 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, मात्र सचिन धस आणि उदय सहारन यांच्या शतकी भागीदारीमुळं भारताला दक्षिण आफ्रिकेला धूळ चारता आलीय. भारतासाठी सचिन धसनं 96 धावांची तर उदय सहारननं 81 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन, माफाका यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
भारताची अत्यंत खराब सुरुवात : पहिल्या पॉवरप्लेमध्येच भारतीय संघानं तीन गडी गमावले. सलामीवीर आदर्श सिंग पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या मुशीर खानला 12 चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. अर्शीन कुलकर्णी 30 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. प्रियांशू मोलियाला केवळ पाच धावा करता आल्या. यानंतर उदय सहारन तसंच सचिन धस यांच्यात शतकी भागीदारी झाली. सचिन धस 95 चेंडूत 96 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अरावेली अविनाश 10 धावांवर तर मुरुगन अभिषेक खाते न उघडताच बाद झाला. कर्णधार उदय सहारन 81 धावा करून धावबाद झाला.
23 धावांवर पहिला धक्का : प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 23 धावांवर पहिला धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या 10 षटकांत स्टीव्ह स्टॉक (12), डेव्हिड टायगर (00) यांच्या विकेट्स गमावल्या. या दोघांनाही वेगवान गोलंदाज राज लिंबानी (60 धावांत तीन बळी) बाद केलं. त्यानंतर प्रिटोरियस आणि सेलेटस्वेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडून डाव सांभाळला. मात्र, दोघांनी 22 पेक्षा जास्त षटकं खेळली. ऑलिव्हर 22 धावा करू शकला, तसंच डेव्हनला फक्त तीन धावा करता आल्या. रिचर्डनं 100 चेंडूत 64 तर कर्णधार जेम्सनं 24 धावा केल्या. सलग तिसरं अर्धशतक झळकावल्यानंतर प्रिटोरियसनं मिडविकेटवर मोलियावर षटकार खेचला, पण मुशीरच्या चेंडूवर मिडविकेटवर मुरुगन अभिषेकनं शानदार झेल घेतला. सेलेत्स्वेननं डावखुरा वेगवान गोलंदाज तिवारीला बाद करत 90 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
अंतिम फेरी ठरणार रोमांचक : सेलेटस्वेनलाही आपल्या अर्धशतकाचं मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयश आलं. त्यांच्या तिवारीच्या चेंडूवर मोलियाने झेल घेतला. युआन जेम्स (19 चेंडूत 24 धावा) आणि ट्रिस्टन लुस (12 चेंडूत 23 धावा) यांच्या खेळीमुळं दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 10 षटकात 81 धावा जोडण्यात यश आलं. 2014 चा चॅम्पियन दक्षिण आफ्रिका हा चालू स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला संघ आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी भिडणार आहे. त्यामुळं अंतिम फेरी रोमांचक होणार आहे.
दोन्ही संघातील प्लेइंग 11 :
- भारत - आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्या पांडे.
- दक्षिण आफ्रिका : लुआन-ड्रे प्रिटोरियस (wk), स्टीव्ह स्टोक, डेव्हिड टायगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान मारेस, जुआन जेम्स (सी), ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका.
हे वाचलंत का :
- अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप; उपांत्य फेरीत भारताचा सामना द. आफ्रिकेशी, टीम इंडियाची मदार 'या' 5 प्रमुख खेळाडूंवर
- अश्विन-बुमराहच्या गोलंदाजीनं 'बॅझबॉल'ची जिरवली, दुसऱ्या कसोटीत साहेबांचा पराभव; भारताची मालिकेत 1-1 नं बरोबरी
- काका-पुतण्याच्या वादापलीकडं क्रिकेट! मैदानात काका-पुतण्यानं 'सलामी' देत केली शतकी भागीदारी