न्युयॉर्क T20 World Cup IND vs PAK : टी20 विश्वचषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणाला. अ गटात झालेला हा सामना न्यूयॉर्कमध्ये रंगला. पण याआधी न्यूयॉर्कमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळं नाणेफेकीला उशीर झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र सामना सुरु झाल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपला जलवा दाखवत भारतीय फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. अवघ्या 100 धावात भारताचे सात फलंदाज तंबूत परतले. भारताकडून ऋषभ पंतनं सर्वाधिक 42 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज नसीम शाहनं 3 तर मोहम्मद आमीरनं 2 बळी घेत भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानंतर मात्र भारतीय संघानं जोरदार खेळाचं प्रदर्शन करत सामना जिंकला.
पाकिस्तानची नाचक्की : या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी या विश्वचषकात पाकिस्तानला अमेरिकेसारख्या नव्या संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. तर दुसरीकडं भारतानं पहिला सामना जिंकलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं नुकताच आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विश्वचषकात भारताचा हा पहिलाच सामना होता, जो त्यांनी 46 चेंडू शिल्लक असताना जिंकला. आता कर्णधार रोहित हाच सामना जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही मैदानात उतरु शकतो. दुसरीकडं, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपल्या प्लेइंग 11 मध्ये इमाद वसीमला स्थान देऊ शकतो. तर आझम खान याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा अमेरिकेकडून पराभव झाला होता. इमाद दुखापतीमुळं त्या सामन्यात खेळू शकला नव्हता.
पाकिस्तानवर भारताचा वरचष्मा : जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने आले, तेव्हा चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 12 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघानं 8 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताननं 3 सामन्यांत यश मिळवलंय. तर एक सामना टाय झाला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
- पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.
हेही वाचा :