नवी दिल्ली T20 World Cup Hat-Tricks : अमेरिका आणि वेस्ट इंजिडमध्ये सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकातील 44व्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. या विश्वचषकात पॅट कमिन्स पहिल्यांदाच खेळताना दिसला आणि त्यानं थेट हॅट्ट्रिक करत इतिहास रचला. कमिन्सनं दोन वेगवेगळ्या षटकांत या 3 विकेट घेतल्या. परंतु, टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक करणारा तो पहिला गोलंदाज नाही. आतापर्यंत टी 20 विश्वचषकात सात गोलंदाजांनी हा पराक्रम केलाय. यात ब्रेट ली सारख्या दिग्गज गोलंदाजाचाही समावेश आहे. मात्र यात भारतीय संघातील एकाही गोलंदाजाचा समावेश नाही.
ब्रेट ली - टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा ब्रेट ली हा पहिला गोलंदाज होता. 2007 च्या टी 20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं सलग 3 फलंदाजांना बाद केलं. त्यानं शकीब अल हसन, मोश्रफे मोर्तझा आणि आलोक कपालींना आऊट करत हॅटट्रिक केली होती. ऑस्ट्रेलियानं हा सामना 9 विकेटनं जिंकला होता.
कर्टिस कॅम्फर - आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरनं 2021 विश्वचषकात नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात सलग तीन नव्हे तर चार विकेट घेतल्या. त्यानं कॉलिन अकरमन, रायन टेन डोश्चाटे, स्कॉट एडवर्ड्स आणि शेवटी रोएलॉफ व्हॅन डर मर्वे यांना बाद केलं होतं. आजपर्यंत टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात सलग 4 विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आयर्लंडनं हा सामना 7 विकेटनं जिंकला होता.
वनिंदू हसरंगा - 2021 च्या टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा वनिंदू हसरंगा हा दुसरा गोलंदाज होता. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्कराम, टेंबा बवुमा आणि ड्वेन प्रिटोरियस यांना सलग तीन चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. हसरंगाच्या हॅट्ट्रिकनंतरही श्रीलंकेला हा सामना 4 विकेट्सच्या फरकानं गमावावा लागला.
कागिसो रबाडा - कागिसो रबाडानं 2021 च्या टी 20 विश्वचषकाची तिसरी हॅट्ट्रिक घेतली. इंग्लंडविरुद्ध त्यानं ही कामगिरी केली होती. रबाडाच्या घातक गोलंदाजीसमोर ख्रिस वोक्स, इऑन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन यांनी लागोपाठ तीन चेंडूंवर विकेट गमावल्या. रबाडाच्या संघानंन म्हणजेच दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 10 धावांनी जिंकला.
कार्तिक मयप्पन - संयुक्त अरब अमिरातीच्या लेगस्पिनर गोलंदाज कार्तिक मयप्पननं 2022 च्या टी 20 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. भानुका राजपक्षे, चारिथ असालंका आणि दासुन शनका यांना बाद करत त्यानं हॅट्ट्रिक पूर्ण केली. या हॅट्ट्रिकनंतरही तो श्रीलंकेला 79 धावांनी विजयापासून रोखू शकला नाही.
जोशुआ लिटल - 2024 पूर्वी आयर्लंड हा एकमेव संघ होता ज्याच्या दोन खेळाडूंनी टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेतली होती. 2021 मध्ये, जोशुआ लिटलनं कर्टिस कॅम्फरच्या पुढच्या वर्षी आयर्लंडसाठी हा पराक्रम केला. 2022 मध्ये त्यानं न्यूझीलंडच्या केन विल्यमसन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांना लागोपाठ बाद करुन हॅट्ट्रिक पूर्ण केली. तरीही आयर्लंडनं हा सामना 35 धावांनी गमावला.
पॅट कमिन्स - पॅट कमिन्स हा टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरलाय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि तोहिद हृदय यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियानं हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी जिंकला.
हेही वाचा :