कोल्हापूर Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेनं अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. स्वप्निलनं जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर त्याचा आतापर्यंतचा प्रवास केला आहे. गुरुवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात देशवासीयांच्या पाठिंब्यावर आणि विठ्ठलाच्या आशीर्वादानं तो नक्कीच सुवर्णपदकाला गवसणी घालेल, असा विश्वास स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी व्यक्त केला.
मागील ऑलिम्पिक हुकली होती संधी : पॅरिस इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत कोल्हापुरचा नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळं यानं कमाल करत नेमबाजीत अंतिम फेरी गाठली. बुधवारी 31 जुलै रोजी झालेल्या पात्रता स्पर्धेत स्वप्नील कुसाळेनं सातव्या स्थानावर राहून 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन इव्हेंटमध्ये 590 गुण मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. स्वप्निल कुसाळे हा मूळचा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्यानं यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पदकं मिळवली आहेत. टोकियो इथं 2020 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याची संधी पात्रता फेरीत हुकली होती. यंदा मात्र त्यानं अंतिम फेरीत पोहोचत देशवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे स्वप्निल हा भारतीय रेल्वे मध्ये टीसी म्हणूनही कार्यरत आहे. त्यानं पुण्यातील बालेवाडी इथं आपल्या नेमबाजीचा सराव केला.
50 m Rifle 3P Men's Qualification
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
Swapnil Kusale finishes 7th with a total score of 590 and qualifies for the final.
Aishwary Pratap Singh Tomar finishes 11th with a total score of 589.
Top 8 from this round qualify for the final.
As more Indian players will play their… pic.twitter.com/rWD8k0Wvcc
नेमबाज अभिनव बिंद्राचा कट्टर फॅन : 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा यशस्वी नेमबाज अभिनव बिंद्राचा खेळ पाहण्यासाठी स्वप्निल कुसाळेनं बारावीच्या परीक्षेकडं दुर्लक्ष केलं होतं. अशी आठवण त्याची आई सरपंच अनिता कुसाळे यांनी सांगितली, तर तेव्हापासूनच या खेळाकडं त्याचा कल होता म्हणूनच वडील शिक्षक सुरेश कुसाळे यांनी 2009 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल केलं आणि इथूनच त्याचा प्रवास सुरु झाला.
6 ऑगस्टला स्वप्निलचा वाढदिवस : 6 ऑगस्ट 1995 रोजी जन्मलेल्या कोल्हापूरच्या या सुपुत्राचा वाढदिवस जवळ आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालून वाढदिवसाचं मोठं गिफ्ट देशवासियांना देण्यासाठी स्वप्निल आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करेल आणि देशाचं नाव जगात गाजवेल, असा विश्वास कांबळवाडी वासियांनी व्यक्त केला.
हेही वाचा :