मुंबई IPL 2024 MI vs RCB : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं (MI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये विजयी मार्ग पकडलाय. गुरुवारी येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) वर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार फलंदाज इशान किशन यांच्याशिवाय सूर्यकुमार यादवही मुंबईच्या विजयाचा हिरो ठरलाय. सर्व प्रथम बुमराहनं 5 विकेट घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. यानंतर ईशान आणि सूर्यानं आक्रमक अर्धशतकं झळकावून संघाला विजय मिळवून दिला.
- आरसीबीचा परभवाचा पंचहार : मुंबईचा या हंगामातील 5 सामन्यांमधील हा दुसरा विजय आहे. या मोसमात या संघानं पहिले 3 सामने गमावले होते. पण आता त्यांनी सलग 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाचा हा 6 सामन्यांमध्ये पाचवा पराभव आहे.
मुंबईचा दणदणीत विजय : या सामन्यात मुंबईसमोर 197 धावांचं लक्ष्य होतं. त्याला प्रत्युत्तर देताना या संघानं 15.3 षटकांतच 3 गडी गमावून सामना जिंकला. मुंबईकडून सलामीवीर इशान किशननं 34 चेंडूत 69 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्यानं 7 चौकार आणि 5 षटकारांचा तडाखा दिला. यानंतर सूर्यकुमार यादवनं अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक केलं. हे या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरलंय. तो 19 चेंडूत 52 धावा करुन बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. तर रोहित शर्मानंही 24 चेंडूत 38 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्यानं 6 चेंडूत 3 षटकार ठोकत नाबाद 21 धावा केल्या. आरसीबीचा कोणताही गोलंदाज फारसा प्रभावी ठरला नाही. तरीही आकाश दीप, विजयकुमार वैशाक आणि विल जॅक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
आरसीबीकडून तीन अर्धशतकं : तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. रन मशीन समजला जाणारा कोहली 9 चेंडूत अवघ्या 3 धावा करत बुमराहचा बळी ठरला. यानंतर आलेला विल जॅकही लगेच बाद झाला. यानंतर आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 40 चेंडूत 61 धावा केल्या. तर रजत पाटीदारनंही 26 चेंडूत 50 धावा केल्या. यानंतर अखेरीस दिनेश कार्तिकनं 23 चेंडूत 53 धावांचा तडाखा दिला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं 21 धावांत सर्वाधिक 5 बळी घेतले. तर गिराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
हेही वाचा :