मुंबई Team India : झिम्बाब्वेला त्यांच्या घरात पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी भारतीय संघाचीही घोषणा केली आहे. टी 20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडं सोपवण्यात आलं आहे. तर एकदिवसीय संघाची कमान रोहित शर्माच्याच खांद्यावर आहे.
🚨 News 🚨#TeamIndia's squad for 3 T20Is & 3 ODIs announced
— BCCI (@BCCI) July 18, 2024
Read More 🔽
शुभमन गिलला नवी जबाबदारी : श्रीलंका दौऱ्यासाठी शुभमन गिलला मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. याचा अर्थ पांड्याला उपकर्णधारपदावरुनही हटवण्यात आलं आहे. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे. या दोन्ही मालिकेत रियान परागलाही संधी देण्यात आली आहे.
नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पहिलाच दौरा : भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा हा पहिला दौरा असेल. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आता त्यांच्या नव्या भूमिकेसाठी सज्ज दिसत आहे. मागील आठवड्यातच बीसीसीआयनं त्यांना भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवलं आहे. गंभीरनं राहुल द्रविडची जागा घेतली आहे. ज्यांचा कार्यकाळ टी 20 विश्वचषक 2024 नंतर संपला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघानं नुकतंच 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत झिम्बाब्वेचा 4-1 नं पराभव केला. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं जूनमध्ये टी 20 विश्वचषक जिंकला होता.
27 जुलैपासून सुरु होणार दौरा : भारतीय संघ 27 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करेल. प्रथम, भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून पल्लेकेले इथं खेळवले जातील. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं खेळवले जातील. 50-50 षटकांचे हे एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ :
भारताचा टी 20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
हेही वाचा :