T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 चा 51 वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. विश्वचषकातील सुपर-8 मधील उपांत्य फेरीची शर्यत रोमांचक राहिली आहे. सुपर-8 मधील दोन्ही सामने जिंकून भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताला पराभूत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड : टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 31 टी-20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहीला आहे. भारतानं 19 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियानं 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला आहे.
- एकूण सामने: 31
- भारत जिंकलेले सामने: 19
- ऑस्ट्रेलियानं जिंकलेले सामने : 11
- रद्द झालेला सामना : 1
टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघान 2007 साली ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर दोन्ही संघ 2010 साली आमनेसामने आले. तेव्हा ऑस्ट्रेलिया विजयी झाले. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियानं पुन्हा भारतावर विजय मिळवला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाला अद्याप भारतीय संघाविरुद्ध टी-20 विश्वचषकात जिंकता आलेलं नाही. भारतीय संघानं यंदाच्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला 73 धावांनी धुळ चारली. 2016 साली 6 विकेटनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघ 2021 मध्ये साखळी फेरीतून बाहेर पडला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघानं विजेतेपद पटकावलं होतं. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. तर भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
- एकूण सामने: 5
- भारत जिंकलेले सामने: 3
- ऑस्ट्रेलिया जिंकला: 2
भारत पराभवाचा बदला घेणार? : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची रोहितसेनेकडे संधी आहे. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. यामध्ये भारतीय संघाला 6 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवामुळं भारताचं वनडे विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकण्याचं स्वप्न भंगलं. रोहितसेना पराभवाचा बदला घेणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं संकट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. परंतु हवामान खात्याच्या अहवालानुसार, सेंट लुसियामध्ये सकाळी पावसाची 55 टक्के शक्यता आहे. तर तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
सामना रद्द झाल्यास कोणाचं नुकसान? : सुपर-8 फेरीतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यास दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक गुण जमा होईल. अशा स्थितीत भारतीय संघ 5 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघ 3 गुणांसह सुपर-8 फेरी पूर्ण करेल. दुसरीकडं अफगाणिस्ताननं आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केल्यास त्यांचे 4 गुण होतील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल.
दोन्ही संघ
- भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
- ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
हेही वाचा
- स्मृती मंधानाच्या झुंझार खेळीनं भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाईटवॉश’, एकदिवसीय मालिका 3-0 ने घातली खिशात - INDW vs SAW
- बटलरच्या वादळी खेळीनंतर इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक! अमेरिकेचा 10 गडी राखून केला पराभव - T20 World Cup 2024
- पाच चेंडूत चार विकेट...; टी 20 विश्वचषकात 14 तासांत दुसरी हॅट्ट्रिक; इंग्लंडच्या गोलंदाजानं रचला इतिहास - T20 WORLD CUP 2024