नवी दिल्ली Anshuman Gaekwad Passes Away : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं बुधवारी सायंकाळी निधन झालं. ब्लड कॅन्सरने ग्रासल्यानंतर गायकवाड यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, कॅन्सरबरोबर सुरू असलेली गायकवाड यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
Shri Anshuman Gaekwad Ji will be remembered for his contribution to cricket. He was a gifted player and an outstanding coach. Pained by his demise. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2024
'बीसीसीआय'नं केली होती मदत : लंडनमधील उपचार पूर्ण झाल्यानंतर अंशुमन गायकवाड गेल्याच महिन्यात भारतात परतले होते. त्यांच्यावरील उर्वरित उपचार बडोदा येथे सुरू होते. त्यांना आर्थिक मदत आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी कपिल देव आणि संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआय) सादही घातली होती. त्यानंतर जय शहा यांनी गायकवाड यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. अंशुमन गायकवाड यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे.
My deepest condolences to the family and friends of Mr Aunshuman Gaekwad. Heartbreaking for the entire cricket fraternity. May his soul rest in peace🙏
— Jay Shah (@JayShah) July 31, 2024
कसं होतं क्रिकेट करिअर : अंशुमन गायकवाड यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी कोलकाता इथं वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1984 च्या शेवटच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या कोलकाता कसोटी हा त्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. त्यांनी 40 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 30.07 च्या सरासरीनं 1985 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 201 होती, जी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केली होती. तसंच गायकवाड यांनी भारतासाठी 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला आहे, ज्यात त्यांच्या नावावर 20.69 च्या सरासरीनं 269 धावा आहेत.
वडीलही होते क्रिकेटपटू : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कोचिंगची जबाबदारी घेतली. 1997-99 दरम्यान ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. गायकवाड यांनी गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (GSFC) मध्येही काम केलं आणि 2000 मध्ये या कंपनीतून निवृत्त झाले. जून 2018 मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) गायकवाड यांना 'जीवनगौरव पुरस्कारा'नं सन्मानित केलं होतं. अंशुमन गायकवाड यांचे वडील दत्ता गायकवाड यांनीही कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.