कोलकाता Virat Kohli : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जून ते 29 जून या कालावधीत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय संघात स्थान मिळवू शकेल की नाही याबद्दल त्याच्या काही चाहत्यांना शंका होती. पण, चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. सध्याच्या परिस्थितीत कोहली हा बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून खेळला जाणार आहे.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) 'ईटीव्ही भारत'ला या आगामी टी-20 विश्वचषकाची माहिती दिलीय. बोर्डाच्या एका विश्वसनीय सूत्रानं सांगितलं की, "आयपीएलनं अजून अर्धा टप्पाही गाठलेला नाही. पण कोहलीनं 146 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं आधीच 300 हून अधिक धावा केल्या आहेत. देशासमोर आजही त्याच्यापेक्षा चांगला पर्याय नाही."
कामगिरीतून केलं स्वतःला सिद्ध : क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल कोहलीकडे सिद्ध करण्यासाठी काहीही नव्हतं. परंतु, इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्याच्या अलीकडील फलंदाजीनं या अटकळांना आता पूर्णविराम दिलाय. आत्तापर्यंत, कोहली (316) हा आयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यात अलीकडेच राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतकही समाविष्ट आहे. कोहलीनं नोव्हेंबर 2022 पासून भारतासाठी फक्त दोन टी-20 खेळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं हे सामने खेळले आहेत. आकडेवारीनुसार कोहलीनं 117 सामन्यांच्या 109 डावांमध्ये 51.75 च्या सरासरीनं आणि 138 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं 4037 धावा केल्या.
ऋषभ पंतचं पुनरागमन निश्चित : निवड समितीचे सदस्य पुढील महिन्याच्या सुरुवातीला टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाला अंतिम रूप देण्यासाठी भेटतील अशी अपेक्षा आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर ऋषभ पंतचं संघात पुनरागमनही निश्चित दिसते. असं विचारलं असता, सूत्रानं सांगितलं की, "पंत हा सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. पंतला खेळातील दिग्गजांनी उच्च दर्जा दिलाय. सर्व अनपेक्षित परिस्थिती वगळता ते त्याला संघात पुन्हा सामिल करुन घेत आहेत. आयपीएलला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याची खेळी कशी आकार घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे."
कोण असू शकतात संभाव्य खेळाडू : कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल याचादेखील आगामी टी-20 मध्ये समावेश होऊ शकतो. गिलला मधल्या फळीत टाकायचं की सलामीला घ्यायचे हा एकच पेच आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश होण्याची खात्री आहे. तर मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही प्रबळ दावेदार आहे. शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तो आता बरा आहे. हार्डहिटर सूर्य कुमार यादव आणि रिंकू सिंग, फिरकीपटू अक्षर पटेल यांचाही 15 सदस्यीय भारतीय संघात समावेश होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :