मुंबई Vijay Shivtare Vs Ajit Pawar : सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात मविआकडून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार किंवा रासपाचे महादेव जानकर हे या जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडं महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळं बारामतीतून कोण-कोणते उमेदवार निवडणूक लढवणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, एकीकडं विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असताना दुसरीकडं शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून विजय शिवतारे यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
... तर शिवतारे यांच्यावर कारवाईचा बडगा : मागील काही दिवसांपासून विजय शिवतारे यांची पक्षाकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. युतीधर्म पाळावा लागेल आणि महायुतीतील कोणताही उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघात उभा केला तर त्याला पाठिंबा द्यावा लागेल, त्यांचा प्रचार करावा लागेल, असं शिवतारेंना सांगण्यात आलंय. मागील दहा दिवसात दोन वेळा विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी युतीधर्म पाळण्याचा सल्ला शिवतारेंना दिला. मात्र, विजय शिवतारे हे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येतंय. परंतू "जर शिवतारे ऐकणार नसतील आणि पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार असतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल", असं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते वैजनाथ वाघमारे (Vaijanath Waghmare) यांनी सांगितलंय.
कारवाईला सामोरं जाण्यास तयार : पक्षाच्या भूमिकेसंदर्भात विजय शिवतारे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "बारामती मतदारसंघात बदल हवा असून ही जनभावना आहे, आणि या जनभावनेचा मी आदर करतो. जरी मला पक्षानं युतीधर्म पाळण्याचा आदेश दिला असला, तरी शेवटी मी अपक्ष उमेदवार म्हणून बारामतीतून उभा राहणार आहे. तसंच जर पक्षाकडून माझ्यावर कारवाई करण्यात आली तर मी कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहे", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळं राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? शिवतारे म्हणाले, "बारामतीच्या जनतेचं..." - VIJAY SHIVTARE
- मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्य; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका - Sunil Tatkare on Vijay Shivtare
- विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare