छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Elections : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्यात ऐन निवडणुकीत नवा पेच निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवार अर्ज करणार असल्याची तयारी सुरू आहे. त्यामुळं मतांचं विभाजन होणार नाही. प्रत्येक मतदार संघात पाचशे किंवा अधिक उमेदवार उभे राहिले तरी मत वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. सरकारला आमच्या मागण्यांकडं आकर्षित करणं आमचा उद्देश असून याबाबत लवकर पूर्ण रणनीती आखली जाईल अशी माहिती, मराठा समन्वयक प्रा. चंद्रकांत भराड (Chandrakant Bharad) यांनी दिलीय.
प्रत्येक गावातून दोन उमेदवार : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाणार आहे. निवडणुका आल्या की, मराठा समाजाला आश्वासन दिलं जातं किंवा तात्पुरता तोडगा काढून वेळ मारून नेली जाते. त्यामुळं समाजाची नेहमी फसवणूक होते. त्यामुळंच यंदा प्रत्येक गावातून दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस मराठा समाजाकडून व्यक्त केला जातोय. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावात उमेदवार कोण असावा याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी युवकांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद दिसून येतोय.
मत वाया जाणार नाही : मराठा युवक प्रत्येक गावातून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं अनेकांना गैरसमज निर्माण झाला आहे. मराठा समाजाचं मत इतर पक्षांना पडू नये याकरता असं केलं जातय. याबाबत उलट सुलट चर्चा समोर आल्या आहेत, मात्र असं मुळीच होणार नाही. मतांचं विभाजन होऊन, मत वाया जाईल असं होऊ देणार नाही असं मत मराठा समाजाकडून व्यक्त केल जातय. मुळात आंदोलन करत असताना सामाजिक भान देखील समाज जपत आहे. आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी लोकसभा निवडणुकीत आपलं मत वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. इतकच काय तर जे उमेदवार निवडणूक लढवतील ते आपलं मत स्वतःलाही देणार नाहीत. योग्य उमेदवार बघून आम्ही ते मतदान करू, मत देऊन त्याचा उपयोग लोकशाही टिकवण्यासाठी नक्कीच होईल. आम्हाला फक्त आमच्या मागण्यांची जाणीव केंद्र आणि राज्य सरकारला करून द्यायची आहे. त्याकरिता हा मार्ग आम्ही अवलंबला असल्याचं भराड यांनी सांगितलं.
24 मार्च रोजी महत्त्वाची बैठक : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन कशा पद्धतीनं सुरू ठेवायचं, याबाबत आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्च रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक अंतरवाली सराटी येथे होणार असून त्याबाबतची तयारी सुरू करण्यात आलीय. कोणत्या गावातून किती उमेदवार उभे करायचे आणि त्याची रणनीती काय असेल याबाबत देखील याच बैठकीत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी राज्यातील सर्वच समन्वयक येणार असून सर्वांकडं असलेल्या वेगवेगळ्या कल्पनांवर तिथे चर्चा केली जाईल. त्यानंतरच मतदान वाया न जाता प्रक्रिया राबवून सरकारवर कसं दबाव तंत्र ठेवायचं याबाबत निर्णय होईल, अशी माहिती चंद्रकांत भराड यांनी दिलीय.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मराठा समाजाला उच्च न्यायालयाचा दिलासा; मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास नकार
- मराठा आरक्षणावरुन मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश; आरक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह
- मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश