पुणे : विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले अर्जही भरले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून एकूण 56 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 'बापूसाहेब पठारे' हे उमेदवार असताना, वडगाव शेरी मतदारसंघातून अजून एका 'बापू बबन पठारे' यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं वडगाव शेरी मतदारसंघात दोन बापू पठारे झाले आहेत. आता अपक्ष उमेदवार बापू बबन पठारे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल : पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार 'बापू पठारे' यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील मांडवगन गावातील 'बापू बबन पठारे' यांनी देखील याच ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार 'बापू बबन पठारे' यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आक्षेप घेतला असून या उमेदवारानं कोणतीही माहिती दिली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
अर्जावर घेतला आक्षेप : याबाबत सुरेंद्र पठारे यांनी सांगितलं, "मंगळवारी आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांकडून एक डमी उमेदवार श्रीगोंदा येथून आणला आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरला. आज अर्जाची छाननी झाली असून आम्ही त्या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. ज्यात या उमेदवाराच्या अर्जात अनेक त्रुटी आहेत. तसंच निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील त्या उमेदवाराच्या अर्जाचं प्रतिज्ञापत्र सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. या अपक्ष उमेदवारानं त्याच्यावर असलेल्या कर्जाची अर्जात माहिती दिलेली नाही. तसंच बँकेतील पैसे देखील अर्जात नमूद केले नाहीत".
मतदारांमध्ये गोंधळ : निवडणूक अधिकारी सचिन बारवकर म्हणाले की, आज अर्जाच्या छाननीला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत 23 उमेदवारांची छाननी झाली असून 24 वा उमेदवार बापू बबन पठारे यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. तर बापू बबन पठारे यांचा उमेदवारी अर्ज आज वैध ठरविण्यात आल्यानं आता वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे आणि अपक्ष उमेदवार बापू पठारे ही दोन्ही नावं समान असल्यानं मतदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -