अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघांनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं. आता अमरावती विधानसभा निवडणूक देखील रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके (Sulbha Khodke) या आता महायुतीच्या उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख (Sunil Deshmukh) निवडणूक रिंगणात राहतील. या दोघांमध्ये निवडणुकीचा अटीतटीचा सामना रंगणार असं वर्षभरापासून बोललं जातय. आता ऐनवेळी भाजपाचे नेते अशी ओळख असणारे माजी मंत्री जगदीश गुप्ता (Jagdish Gupta) यांनी काहीही झालं तरी निवडणूक लढणार अशी भूमिका जाहीर केलीय. यामुळं अमरावती विधानसभा मतदारसंघात तीन दिग्गजांमध्ये होणारी लढत ही लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे हे तिघेही अनुभवी राजकारणी असून अतिशय समंजस आहेत.
मतदारसंघाचा असा आहे इतिहास : आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या 13 निवडणुकीमध्ये 10 वेळा अमरावती मतदारसंघात काँग्रेसनं बाजी मारली. तर तीन निवडणुकांमध्ये भाजपानं झेंडा फडकवला. अमरावती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड म्हणूनच ओळखला जातो. 1962 ते 1985 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला. 1990 आणि 1995 अशा सलग दोन निवडणुकीत भाजपाचे जगदीश गुप्ता विजयी झालेत. 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपाच्या जगदीश गुप्ता यांना विजयाच्या हॅट्रिक पासून रोखले. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख हे भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी झालेत. 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यामुळं डॉ. सुनील देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये डॉ. सुनील देशमुख पराभूत झाले होते. 2014 मध्ये मात्र भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आणि डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून भाजपाने पुन्हा एकदा अमरावती विधानसभा मतदारसंघ काबीज केला. 2019 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत भाजपाचे डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन वर्षात पुन्हा एकदा डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये परतले. आता अमरावती विधानसभा मतदारसंघात डॉ. सुनील देशमुख हेच काँग्रेसचे उमेदवार असतील.
खोडके, देशमुख दोघांचीही भिस्त मुस्लिम मतदारांवर : अमरावती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 72 हजार 342 मतदार आहेत. यापैकी मुस्लिम मतदारांची संख्या ही 80 हजार तर 40 हजार दलित मतदार आहेत. मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या ही काँग्रेससाठी प्लस पॉइंट मानली जाते. विद्यमान आमदार सुलभा खोडके यांच्या पाठीशी गेल्या निवडणुकीत मुस्लिम मतदार मोठ्या ताकदीनं उभे होते. हे मतदार तुटू नयेत यासाठी सुलभा खोडके यांनी संपूर्ण पाच वर्ष मुस्लिम भागात चांगला संपर्क ठेवला. आता सुलभा खोडके या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असताना त्यांना गेल्या निवडणुकीतील मुस्लिम मतं आपल्यापासून हिरावू नये असं वाटतंय. यामुळं मुस्लिम मतदारांना जपण्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न आहेत. महाविकास आघाडीकडून डॉ. सुनील देशमुख हे निवडणूक रिंगणात असतील तेव्हा मुस्लिम मतदार हे पंजालाच मतदान करणार असा मोठा विश्वास त्यांना आहे. मुस्लिम मतदार सोडले तर सुलभा खोडके आणि डॉ. सुनील देशमुख यांच्या बाजूनं देशमुख, पाटील असे मराठा मतदार यांच्यासह इतर जातींचं समीकरण या दोघांच्या बाजूला कसं जाईल यावर बरंच काही अवलंबून आहे.
मुस्लिम उमेदवारही असणार रिंगणात : एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचा सर्वाधिक भर हा मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याकडं असताना मुस्लिम समुदायातून देखील एक दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराकडं अधिक मुस्लिम मतदार जाऊ नयेत यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं मुस्लिम समुदायातील अनेकांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात असल्याचं बोललं जातंय. एकूणच मुस्लिम मतदार हे पंजाकडं जातील की घड्याळाला मत देतील यावर सारं काही अवलंबून आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा थंडवली : लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक गाजावाजा हा भाजपाचा होता. खरंतर 2014 च्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांच्या विजयामुळं अमरावतीत भाजपाला नवीन संजीवनी मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खरंतर भाजपानच डॉ. सुनील देशमुख यांचा गेम केला. असं असलं तरी विधान परिषदेचे माजी सदस्य आणि विद्यमान भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजपा चांगलीच रंगात होती. कदाचित लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा विजयी झाल्या असत्या तर महायुतीमध्ये अमरावतीची जागा ही नवनीत राणा यांनी काहीही झालं तरी त्यांच्या कट्टर विरोधक असणाऱ्या सुलभा खोडके यांच्यासाठी सुटू दिली नसती. अशा परिस्थितीत भाजपामधून अनेक वर्षांपासून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना यावेळी उमेदवारी मिळाली असती. माजी शहराध्यक्ष किरण पातुरकर, माजी आमदार प्रवीण पोटे, माजी महापौर किरण महल्ले, अॅड. प्रशांत देशपांडे यांचंही विधानसभा निवडणूक लढण्याचं स्वप्न होतं आणि यासाठी ते गत तीन-चार वर्षांपासून मैदानात देखील उतरले होते. खरंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमरावतीत महायुतीमध्ये अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी सुटल्यानं भाजपातील पदाधिकारी कार्यकर्ते अगदी शांत झाले आहेत.
जगदीश गुप्तांच्या एन्ट्रीनं रंगत : अमरावती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. सुनील देशमुख आणि महायुतीच्या सुलभा खोडके यांच्यात थेट लढत पाहायला मिळेल असं वाटत असताना, भाजपा नेते जगदीश गुप्ता यांनी निवडणूक लढणार असं जाहीर केल्यामुळं अमरावती विधानसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. डॉ. सुनील देशमुख आणि सुलभा खोडके या दोघांनाही आपली खरी ताकद मुस्लिम मतदार वाटत असताना, संघाचे कट्टर कार्यकर्ता असणारे जगदीश गुप्ता हे भाजपाशी बंडखोरी करून मैदानात उतरले तर भाजपातील अनेकांना ते आपला उमेदवार वाटू शकतात. जगदीश गुप्ता हे पक्षात विशेष असे सक्रिय वाटत नसले तरी त्यांची इमेज मात्र सध्या अमरावती विधानसभा मतदार संघच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय असणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा तगडीच आहे. 3 लाख 72 हजार 342 मतदारांपैकी मुस्लिम आणि दलित अशी एक लाख वीस हजार मतं वगळता उर्वरित हिंदूंच्या एकूण 2 लाख 52 हजार 342 मतांमधून जगदीश गुप्ता यांच्या बाजूनं किती मतदान होईल यावर बरच काही अवलंबून आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना काहीही झालं तरी त्यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या सुलभा खोडके या अमरावतीच्या आमदार नको आहेत. अशा परिस्थितीत नवनीत राणा या जय श्रीराम म्हणत जगदीश गुप्ता यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्या तर त्यात कुठलंही आश्चर्य नसणार.
मतदारसंघात अशा आहेत समस्या : खरंतर 1999 आणि 2004 च्या निवडणुकीनंतर अमरावती विधानसभा मतदारसंघाचा विकास हा झपाट्यानं सुरू झाला. अमरावती शहराचा चेहरा मोहरा याच कालखंडात बदलला. विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत त्यावेळी वित्त राज्यमंत्री असणारे डॉ. सुनील देशमुख यांचं अतिशय चांगलं ट्युनिंग होतं. यामुळंच अमरावती शहराला विकासात्मक कलाटणी मिळाली. अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्यावर ओसाड पडलेलं अमरावती रेल्वे स्थानक मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालं. 2009 मध्ये रावसाहेब शेखावत हे आमदार झाल्यावर देखील अमरावती विधानसभा मतदारसंघात भरभराटीचा काळ होता. 2014 पासून मात्र अमरावती विधानसभा मतदारसंघात विशेष असं कुठलंही काम झालं नाही. अमरावती विमानतळ आज देखील सुरू झालेलं नाही. शहराचा औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कुठलाही विकास गत दहा वर्षात खुंटलेलाच दिसतो. इतकंच काय तर अमरावती शहरातील अतिमहत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था देखील खराब आहे. शहरातील एक दोन मुख्य चौक वगळता ट्रॅफिक सिग्नलची बोंबाबोंब असल्यानं वाहतूक व्यवस्थेची दाणादाण उडाली. अवैध धंद्यांना प्रचंड ऊत आला असून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
आतापर्यंतचे आमदार
1962 उमरलाल केडिया (काँग्रेस)
1967 के एन नवाथे (काँग्रेस)
1972 दत्तात्रय मेटकर (काँग्रेस)
1978 सुरेंद्र भुयार (काँग्रेस)
1980 सुरेंद्र भुयार (काँग्रेस)
1985 डॉ.देवीसिंह शेखावत (काँग्रेस)
1990 जगदीश गुप्ता (भाजपा)
1995 जगदीश गुप्ता (भाजपा)
1999 डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस)
2004 डॉ.सुनील देशमुख (काँग्रेस)
2009 रावसाहेब शेखावत (काँग्रेस)
2014 डॉ.सुनील देशमुख (भाजपा)
2019 सुलभा खोडके (काँग्रेस)
लोकसभा निवडणुकीतील अमरावती विधानसभा मतदारसंघात झालेलं मतदान
बळवंत वानखडे (काँग्रेस) -1 लाख 14 हजार 702
नवनीत राणा (भाजपा) - 73 हजार 54
2019 चा निकाल
सुलभा खोडके (काँग्रेस) - 82 हजार 581
सुनील देशमुख (भाजपा) - 64 हजार 313
अशी आहे मतदार संख्या
पुरुष मतदार : 1 लाख 87, 614
महिला मतदार : 1लाख 84, 701
इतर : 27
एकूण मतदार : 3 लाख 72, 342
हेही वाचा -
- कोल्हापुरात वातावरण टाईट, विधानसभेला 'टफ फाईट'; 10 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडी - महायुती आमनेसामने
- विधानसभा निवडणूक 2024 : काटोलमध्ये काका पुतण्यात रंगणार सामना ? अनिल देशमुखांविरोधात आशिष देशमुख मैदानात ?
- भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून 110 उमेदवारांच्या नावांना मंजुरी, लवकरच पहिली यादी होणार जाहीर