नवी दिल्ली : महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यावरून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीवर निशाणा साधला.
अरविंद सावंत काय म्हणाले? : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत म्हणाले, "सरकार स्थापनेला आणि मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यास उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे, महायुतीमधील समन्वयाचा अभाव आणि मुख्यमंत्री पदावरुन झालेली भांडणं आहे. जर महायुती ऐवजी महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असतं, तर हेच लोक आरोपांची पेटी घेऊन बसले असते. तसंच अशा परिस्थितीत भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संविधानाच्या नियमांचा हवाला देत 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्यास बांधील असल्याचं सांगितलं असतं. मात्र, आता महायुतीचे नेते कोणतेही नियम पाळत नाहीत."
ईव्हीएमवरुन टीका : अरविंद सावंत यांनी महायुतीच्या विजयाचं मुख्य कारण ईव्हीएम घोटाळा असल्याचं सांगितलं. तसंच महायुतीच्या नेत्यांवर बनावट व्हिडिओ पसरवणे आणि पैसे वाटल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेना (उबाठा) ईव्हीएमचा मुद्दा न्यायालयात नेणार का? या प्रश्नावर सावंत म्हणाले की, "आता आमचा न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही." महायुतीच्या विजयात 'लाडकी बहीण योजने'चाही हातभार असल्याची कबुली सावंत यांनी दिलीय.
- खरी शिवसेना कोणाची? : राज्यात खरी शिवसेना, खोटी शिवसेना यावरुन प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता खासदार सावंत म्हणाले, "मुलाच्या नावातून वडिलांचं नाव काढता येत नाही. खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती. त्यांच्याच काळात त्यांनी उद्धव ठाकरेंना आपला वारसदार बनवलं होतं. हीच खरी शिवसेना आहे."
एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्रिपदी कोण होणार? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना भाजपाचा निर्णय मान्य असल्याचं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जे हवंय ते होईल. सरकार स्थापनेत आमच्या बाजूनं कोणताही अडथळा नाही." त्यामुळं महाराष्ट्रात आता भाजपाचाच मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झालंय.
हेही वाचा -