रत्नागिरी Uddhav Thackeray : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसंच महायुतीचे उमेदवार नारायण राणेंवरही जोरदार टीका केलीय.
अबकी बार भाजपा तडीपार : उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले, "मला कोकणात प्रचार करण्याची गरज नाही. कोकण हे आम्हा ठाकरे कुटुंबीयांचं हृदय आहे. आमची शिवसेना चोरली, त्यांच्याकडे धनुष्यबाण बाण दिलं. पण आता कोकणातूनच धनुष्यबाण गायब केला. लाचारांना हे कळलंच नाही, "अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा विरोधात लाव्हारस उफाळला आहे. या 56 इंचावरच्या छातीवरची हवा पण गेली आहे. अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. तसंच अबकी बार भाजपा तडीपार! या भाजपाला पहिले निर्यात करा, त्यांना सातासमुद्रापार जाऊद्या. यांना लायकीप्रमाणे सूक्ष्म खातं दिलं, अशी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे यांच्यावर टीका केली.
आमची घराणेशाही लोकांना मंजूर : "ही माझी वडिलोपार्जित कमाई आहे. आमची घराणेशाही लोकांना मंजूर आहे. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नकोय. पण गुंडांची घराणेशाही हवीय. जर शिवसेना उभी राहिली नसती तर आज गुंडाराज झालं असतं. तुम्हाला गुंडाराज हवंय का?" असा सवालही त्यांनी यावेळी केला. रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, "जर शिवसेनामध्ये पडली नसती तर बारसुचा विषय यांनी केव्हाच संपविला असता. बारसुची रिफायनरी विरोध डावलून उभी करतील. पण कोणताही विनाशकारी प्रकल्प मी आणू देणार नाही. हा प्रकल्प कागदावरुन पुसून टाकू. एका बाजूला विनाश आहे. दुसऱ्या बाजूला विनायक आहे. तुम्हाला काय हवं ते बघा," असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले.
आमचं सरकार आल्यावर आम्ही तुमच्या घरात घुसणार : आम्हीही 'जय श्री राम' बोलतो. आम्ही रामाचे विरोधक नाही. तुम्ही दोघं उपरे आहात. आमच्या नसानसातून जय भवानी जय शिवराय काढाल का? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर केली. राजन साळवी यांच्या घरात घुसलात. आमचं सरकार आल्यावर तुमच्या घरातही घुसणार, असा इशारा देखील ठाकरे यांनी यावेळी सभेत दिला. 400 पार कशासाठी तर घटना बदलण्यासाठी आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्रानं ही घटना लिहिली म्हणून तुम्ही ती बदलण्यासाठी निघाला आहात. गुजरातच्या भूमीत औरंगजेब जन्माला आला त्याला आम्ही काय करू? आमच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, असंही ठाकरे म्हणाले.
गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही- भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, " जी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले. पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला. ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली. कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. पंतप्रधान मोदीजी आणि नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही.
हेही वाचा :