मुंबईSanjay Raut News - खासदार संजय राऊत म्हणाले की, " महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा कालही सुरू होती. आजही चर्चा सुरू राहील. तिन्ही पक्षांनी आपापलं जागावाटप जवळपास पूर्ण केलं आहे. सोमवारी शरद पवार आणि जयंत पाटील हे मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली. प्रचाराची रणनीती ठरविण्यासंदर्भात चर्चा झाली. काँग्रेसने महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यानं त्यांची यादी दिल्लीतून जाहीर होते. शिवसेनेची पहिली यादी तयार असून ती आम्ही दिवसभरात कधीही प्रसिद्ध करू, असेही राऊत म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर आमच्या सोबतच राहतील- संजय राऊत पुढे म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव कायम आहे. यासंदर्भात अजूनही चर्चा सुरू आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, देशात व महाराष्ट्रात इदी अमिनचं राज्य हुकूमशाही पद्धतीनं सुरू आहे. संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करत आहेत. संविधान गिळण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रसंगी आम्ही इंडिया आघाडी या विरोधात लढत आहोत. या लढाईत बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत ठामपणे उभे राहतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहित आहे. म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात. परंतु त्याच्यामध्ये समाजाचं, राष्ट्राचं हित असतं, असं आम्ही मानतो. हा परखडपणा त्यांची ताकद आहे. आम्ही सतत त्यांच्याशी संवाद साधून आहोत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या हातात काय आहे? नाशिकमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणाले, " इच्छुक तर फार असतात. परंतु त्यांना ती जागा मिळायला हवी. शरद पवार असते तर कदाचित छगन भुजबळ यांना ती जागा मिळाली असती. जागा द्यायची की नाही हे अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे दिल्लीचे नवीन गुजराती नेते ठरवतील . यांच्या हातात काय आहे? महाराष्ट्रात यापूर्वी जागा वाटपाच्या बैठका मातोश्रीवरच होऊन निर्णय घेतले जात होते. आता शिंदे यांना दिल्लीत जावं लागतं. अजित पवार यांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं. इतकंच नाही तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही दिल्लीत जावं लागतं. पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्यांना दिली. आज महायुतीत व महाविकास आघाडीमध्ये हाच फरक आहे. आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही. तर आम्ही आमचं जागा वाटप महाराष्ट्रातच करतो. आम्ही मातोश्री किंवा सिल्वर ओकवर चर्चा करतो. कारण हे राज्य आमचं आहे.
एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात हिंमत नाही- खासदार राऊत म्हणाले, "पवार आणि ठाकरे यांचे नेतृत्व आज राज्यात आहे. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही," असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. पुढे राऊत म्हणाले, " एकनाथ शिंदे व अजित पवार यांना कुठलीही प्रतिष्ठा नाही आहे. ब्रिटिश किंवा मोगल काळामध्ये मंडलिक संस्थानांचे महत्त्व होतं. तेच महत्त्व या दोघांना महाराष्ट्रात आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची हिंमत किंवा कुवत या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत औरंगजेबाच्या दरबारात गेले. त्यांना माहित पडलं की इथे आपला अपमान होतोय. तेव्हा ते ताडकन परत महाराष्ट्रात आले. परंतु या दोन्ही नेत्यांना वारंवार दिल्ली दरबारी जावं लागत आहे."
रामलीला मैदानावर महारॅली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विषयावर संजय राऊत म्हणाले की, "रामलीला मैदानावर ३१ मार्चला एक महारॅली आयोजित करण्यात आली. देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहेत. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ती अटक पाहता या देशावर हुकूमशाहीचंच राज्य सुरू आहे. बनावट खटले आणि खोटे पुरावे दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. या विरोधामध्ये आम्ही सर्व एकवटणार आहोत. या महारॅलीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे शरद पवार उपस्थित राहणार आहेत," असेही खासदार राऊत म्हणाले.
हेही वाचा-