मुंबई Rajya Sabha Election 2024 : देशातील 15 राज्यात 56 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होतंय. यात महाराष्ट्रातून सहा राज्यसभा जागांसाठी निवडणूक होत असून, आज (गुरुवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. दरम्यान, आज महाराष्ट्रातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
सहा उमेदवार कोणते : महाराष्ट्रात सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक होत आहे. यात महायुतीचे पाच उमेदवार तर महाविकास आघाडीकडून एक उमेदवार आहे. महायुतीतील भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी दिलीय. तर शिवसेनेकडून उच्चशिक्षित मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलीय.
महाविकास आघाडीकडून नवी दिशा : महाविकास आघाडीकडून चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना सामोरी जाताना त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केलीय. सध्या देशात शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला यांचे अनेक प्रश्न आहेत. महागाईनं डोकं वर काढलंय. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढलीय, असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. पक्षश्रेष्ठीनं माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, तो विश्वास मी सार्थ ठरवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझ्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असं चंद्रकांत हंडोरे यांनी यावेळी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात एकता आणि समता निर्माण होईल, आणि त्याची सुरुवात या राज्यसभेच्या निवडणुकीतून होईल, असा विश्वास हंडोरे यांनी व्यक्त केलाय.
महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील-मुख्यमंत्री : राज्यसभेच्या सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "महायुतीचे सर्व उमेदवार जिंकून येतील कारण आमच्याकडं बहुमत आहे आणि बहुमताचा आकडा महत्त्वाचा असतो." शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मिलिंद देवरा हे एक उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. त्याचा फायदा महायुतीला नक्कीच होईल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते. आता मिलिंद देवरा हे शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार असल्यामुळं नक्कीच त्याचा सर्व क्षेत्राला फायदा होईल. ही निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा :
- प्रफुल्ल पटेल गिरवणार नितीश कुमारांचा कित्ता; खासदार होण्यासाठी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभा निवडणुकीचा भरणार अर्ज
- चंद्रकांत हंडोरे पुन्हा अडचणीत येणार का? विधिमंडळ बैठकीला काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती
- राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, 'आयारामांचं' नशिब फळफळलं; अजित पवार गटाचे मात्र 'वेट अॅंड वॉच'