मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. महाविकास आघाडी आणि महायुतीमधून आपापल्या कुटुंबियांची राजकीय सोय लावण्याचे प्रकार वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहेत. वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात असे प्रकार यापूर्वी देखील राज्याने पाहिले आहेत. मात्र, यावेळच्या निवडणुकीत ज्या पक्षात कार्यरत आहोत त्या पक्षातून विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं केवळ आमदारकीसाठी दुसऱ्या पक्षात उडी मारण्याचे प्रकार वाढीस लागल्याचं चित्र आहे.
यांनी केला पक्षात प्रवेश : भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली. मात्र, भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कुडाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. संदीप नाईक यांचे वडील माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांना या निवडणुकीसाठी पुन्हा भाजपाने उमेदवारी दिली आहे. मात्र, संदीप नाईकांना आमदार व्हायचं असल्यानं त्यांनी हाती तुतारी घेतली आहे.
उमेश पाटील यांनी दिला राजीनामा : आता राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. याआधी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. समरजितसिंह घाटगे यांनीही तुतारी हाती घेतली होती. तसंच दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षात येणाऱयांची संख्या जास्त असल्याचं दिसून येत आहे.
संदीप नाईकांच्या हातात तुतारी : भाजपाच्या माध्यमातून यावेळी तरी बेलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक इच्छुक होते. मात्र, भाजपाच्या माध्यमातून ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक व बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी न मिळाल्यानं संदीप नाईक प्रचंड नाराज झाले. अखेर त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
राजकीय पक्षांमधील फूट इच्छुकांच्या पथ्यावर हा प्रकार लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे. दोन मुले असणाऱ्या कुटुंबातील एकाने एका पक्षात तर दुसऱ्याने दुसऱ्या पक्षात जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी कधी मिळणार हा प्रश्न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानं इच्छुक उमेदवारांच्या संधीत वाढ झाल्याची आणि ही फूट त्यांच्या पथ्यावर पडल्याचं चित्र आहे. निवडणूक लढवण्यासाठी जास्त पक्ष उपलब्ध असल्यानं उमेदवारांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. हरियाणातील विधानसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातील मतविभागणीचा लाभ भाजपाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - जयंत माईणकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच : भाजपाचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. या मतदारसंघासाठी भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर दोन वेळा विजयी झाले होते.
नांदगाव मतदारसंघातून भुजबळांचे पुतणे इच्छुक : नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून गेल्या तीनवेळा छगन भुजबळ विजयी झाले आहेत. ते सध्या मंत्री आहेत. त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना नुकतेच विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. मात्र, भुजबळांचे पुतणे नांदगाव मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची तयारी असल्याचे वृत्त समोर आलं होतं.
हेही वाचा -