कोल्हापूर NCP Name Dispute : मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलंय. यानंतर यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावर कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलीय. "ज्याप्रमाणे शिवसेनेची शकलं पडली आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर केंद्रातील सत्तेचं बळ वापरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या घशात घालण्याचं काम भाजपानं केलंय. केंद्रीय निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा बटिक झालाय, त्यामुळं येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोल्हापुरी हिसका दाखवू" अशा संतप्त भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापुरची ओळख : कोल्हापुरात 10 जून 1999 रोजी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्या कोल्हापूर जिल्ह्यानं राष्ट्रवादीला 2 खासदार आणि 6 आमदार दिले होते. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होण्यात कोल्हापूर जिल्ह्याचं मोठं योगदान आहे. याच जिल्ह्यानं दिवंगत दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर यांसारखे दिग्गज नेते राष्ट्रवादीला दिले. सहकाराची पाळीमुळं घट्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेली दशकभर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडून भारतीय जनता पक्षाच्या सत्तेसोबत गेलेले अजित पवार यांच्या विरोधात कोल्हापुरातही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. पक्षाच्या फुटीनंतर जुने जाणते पदाधिकारी शरद पवारांसोबत तर अनेक ठिकाणी सत्ताधारी असलेले नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना बहाल केल्यानंतर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी अजित पवार विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असून अजित पवारांना कोल्हापूरी हिसका दाखवू", असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलाय.
ईडीच्या भीतीनं नेते सत्तेसोबत : आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षात असलेले नेते गेली 20 वर्ष सत्तेत आहेत. मंत्रीपद भोगत आहेत. मात्र सत्ता काळात केलेले गैरव्यवहार बाहेर पडत असल्यानं आणि ईडी सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमेरा मागे नको या भीतीनंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते भारतीय जनता पक्षाच्या छत्रछायेखाली गेली आहेत. मात्र, सामान्य जनता सर्वकाही जाणती आहे. येणाऱ्या निवडणुकीत या नेत्यांना त्यांची जागा कळेल, असा इशाराही यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
हेही वाचा :