मुंबई Mumbai Congress Protest : दिल्लीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली असता भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना त्यांची जात विचारली. "जात विचारुन भाजपानं राहुल गांधी यांचाच नाही तर देशातील एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास त्यासोबत ओबीसी समाजाचा अपमान केल्याचं कॉंग्रेस नेत्यांनी म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर आज (1 ऑगस्ट) काँग्रेस पक्षाच्यावतीनं राज्यभर भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं सदर समाजाची माफी मागावी," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
नाना पटोले यांची टीका : यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले म्हणाले की, "लोकसभेत राहुल गांधींना जात विचारल्यामुळं भाजपा विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. तसाच बहुजन समाजातदेखील संताप आहे. आज कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन भाजपाच्या मनुवादी वृत्तीचा निषेध व्यक्त केलाय. अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं देखील सदर समाजाची माफी मागावी", असं नाना पटोले म्हणाले.
मविआच्या जागा वाटपाची बैठक 7 ऑगस्ट रोजी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं 7 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला रविवारी मुंबईत येणार आहेत. जागा वाटपासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीतील काँग्रेस नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर 7 ऑगस्टला मविआच्या जागा वाटपाची बैठक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीत उपवर्गीकरणाच्या निर्णयावर पटोले म्हणाले की, "या निर्णयाचं स्वागत आहे. मात्र, सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करणार की नाही याबाबत शंका आहे."
मुंबई काँग्रेसनं अनुराग ठाकूरच्या प्रतिमेला फासलं काळं : मुंबई काँग्रेसच्या वतीनं मुंबई काँग्रेस कार्यालय परिसरात आज अनुराग ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला काळं फासलं. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचं पंतप्रधान मोदींनी समर्थन केलंय. त्यामुळं त्यांचादेखील निषेध करत असल्याचं मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी सांगितलं. तसंच भाजपाची अशा प्रकारची भूमिका कायम राहिल्यास ठाकूर यांचे पुतळे चौका-चौकात जाळण्याचा इशारादेखील युवराज मोहिते यांनी दिलाय.
हेही वाचा -