जालना Manoj Jarange Patil News : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 17 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज (26 फेब्रुवारी) मराठा बांधवांच्या मागणीवरून त्यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. तसंच दोन दिवसांच्या उपचारानंतर मी राज्यातील प्रत्येक गावात जाऊन समाज बांधवांना भेटणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
...तर मराठा समाज मोदींना डोक्यावर घेऊन नाचेल : यावेळी बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडं लक्ष द्यावं. जर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवला तर नक्कीच मराठा समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल." पुढं मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, "मी मुंबईला भुजबळांच्या गावातूनच जाणार होतो. तेव्हा त्यांना कळालं असतं की माझ्या मागं किती मराठा बांधव आहेत."
देवेंद्र फडणवीसांवरही साधला निशाणा : आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टीका केली. ते म्हणाले की, "फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर करू नये. ते पोलिसांचा वापर करून मराठा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करताय", असा आरोपही जरांगी यांनी केला. तसंच जर त्यांना हे बंद केलं नाही तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही त्यांना फडणवीसांना दिला आहे.
नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था पाळावी : जरांगे पाटलांनी रविवारी (25 फेब्रुवारी) देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते थेट फडणवीसांच्या मुंबईतील 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवल्यानंतर त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून अनेकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. यासंदर्भात अधिक माहिती देत जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, "राज्यातील आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसंच इंटरनेट सुविधाही काही काळासाठी बंद होती." तसंच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था पाळावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
हेही वाचा -